Kapil Sharma Birthday Special : 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला विनोदवीर कपिल शर्माचा (Kapil Sharma) आज वाढदिवस आहे. मेहनतीच्या जोरावर कपिलने आज स्वत:ला सिद्ध केलं आहे. 2 एप्रिल 1981 रोजी अमृतसरमध्ये जन्मलेल्या कपिलकडे आज नाव, फेम आणि पैसा असं सर्वकाही आहे. विनोदवीर आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 


कपिल शर्माच्या संघर्षाची कहाणी


कॉलेजमध्ये असताना कपिलला अभिनयाची गोडी लागली. महाविद्यालयीन पातळीवरील अनेक नाटकांत कपिलने काम केलं आहे. कपिल शर्माचे वडील पोलीस होते. कर्करोगामुळे वडिलांचे छत्र हरपले आणि कमी वयाच्या घराची जबाबदारी कपिलच्या खांद्यावर आली. पैसे कमवण्यासाठी कपिल कधी कार्यक्रमांत गाणं गात असे तर कधी कॉल सेन्टरमध्ये काम करत असे. कपिल शर्माने गायक व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण मुंबईत आल्यानंतर कपिल शर्माने वेगळ्याच मार्गाचा अवलंब केला. 






कपिल शर्माचा प्रवास...


'लाफ्टर चॅलेंज' या कार्यक्रमाच्या माध्यमातून कपिल शर्माने त्याच्या करिअरला सुरुवात केली. तो या कार्यक्रमाचा विजेता झाला आणि त्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं. या कार्यक्रमामुळे कपिलच्या लोकप्रियतेत वाढ झाली. पण त्याला खरी ओळख 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' (Comedy Nights With Kapil) या कार्यक्रमाने दिली. हा त्याचा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्याचा 'द कपिल शर्मा शो' हा कार्यक्रमदेखील खूप गाजला. कपिल शर्माने 'किस किसको प्यार करुं', 'फिरंगी' आणि 'ज्विगाटो' सारख्या सिनेमांत काम केलं आहे. 


आलिशान घर ते महागड्या गाड्या


कपिल शर्मा सध्या मुंबईतील अंधेरीमध्ये राहतो आहे. त्याच्या आलिशान बंगल्याची किंमत 15 कोटींच्या आसपास आहे. कपिलला गाड्यांचीदेखील प्रचंड आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक लग्झरी गाड्यांचा समावेश आहे. यात रॉयल इनफील्ड बुलेट 500 बाइक, मर्सिडीज बेंज S350, रेंज रोवर इवॉक, वोल्वो एक्ससी 90 सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. तसेच त्याची स्वत:ची एक व्हॅनिटी व्हॅनदेखील आहे. 


कपिल शर्माची एकूण संपत्ती 280 कोटींच्या आसपास आहे. विनोदवीर 'द कपिल शर्मा शो'च्या एका भागासाठी 50 लाख मानधन घेतो. तसेच जाहिरातींमधूनदेखील तो लाखो रुपये कमावतो. कपिल शर्मा 2018 साली गिन्नी चतरथसोबत लग्नबंधनात अडकला आहे. त्यांना त्रिशान आणि अनायरा ही दोन गोड मुलं आहेत. 


संबंधित बातम्या


Zwigato Review : वास्तवाची जाणीव करून देणारा कपिल शर्माचा 'झ्विगॅटो'; मात्र 'ही' कमी जाणवते