बीड: दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत. भवानवाडी गावच्या दिलावर खान यांनी देखील स्मार्ट शेती करण्याचा निर्णय घेतला आणि सात एकर डोंगराळ जमिनीवर ऑस्ट्रेलियन पद्धतीने आंब्याची लागवड केली. यातून गेल्या दोन वर्षांपासून लाखोंचं उत्पन्न घेत आहेत.


व्यवसायाने कर सल्लागार असलेले दिलावर खान यांनी डोंगरात असलेली आपली वडिलोपार्जित शेती कसण्याचा निर्णय घेतला. डोंगर फोडून त्यांनी जमीन सुपिक केली आणि यामध्ये ऑस्ट्रेलियन पद्धतीने केशर आणि दशेरी जातीच्या आंब्याची लागवड केली. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे एका एकरात त्यांना 1160 झाडांची लागवड करता आली. 


ऑस्ट्रेलियन पद्धतीच्या वापरामध्ये त्यांनी तीन बाय बारा या अंतरावर झाडांची लागवड केली असून याची निगा राखण्यासाठी दरवर्षी या झाडांची छाटणी केली जाते. प्रत्येक झाडाची व्यवस्थित सेटिंग करून समान पद्धतीने त्यांना अन्नद्रव्ये दिले जातात. त्यामुळे या झाडांवर रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन फळधारणेची क्षमता देखील वाढली आहे.


वडिलोपार्जित शेतीची जोपासना करून कमी पाण्याच्या उपलब्धतेवर दिलावर यांनी डोंगरावर जमिनीत आंब्याची लागवड करून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. ज्या जमिनीत कुठलंही पीक येईल याची शाश्वती नव्हती त्या जमिनीतून त्यांना लाखोंचा नफा मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी त्यांची शेती पाहण्यासाठी येत आहेत.


नवीन पद्धतीने लागवड केल्यामुळे एका एकरात झाडांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्याची योग्य निगा राखण्यासाठी शेणखताचा आणि इतर सेंद्रीय निविष्ठांचा वापर केला जातोय. डोंगराळ जमीन असल्यामुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा झाल्याने झाडांच्या मुळांवर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. या आंब्याची तोडणी झाल्यानंतर तो सेंद्रिय पद्धतीने पिकवला जातो. त्यामुळे बाजारात या आंब्याला जास्तीचा दर मिळत आहे.


गेल्या वर्षी याच सात एकर आंब्याच्या बागेतून दिलावर खान यांना पाच टन उत्पादन होऊन पाच लाख रुपये  मिळाले होते. यावर्षी दहा टनाच्या उत्पन्नातून त्यांना दहा लाख रुपये मिळणार आहेत. दरवर्षी या बागेच्या उत्पादनात वाढ होत असून यापुढे वर्षाला 40 टनांपर्यंत उत्पन्न मिळण्याची त्यांची अपेक्षा आहे. पारंपरिक पद्धतीने लागवड केलेल्या आंब्याला सरकारकडून अनुदान मिळते, मात्र ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केलेल्या या आंब्याच्या बागाला अनुदान मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे.