Agricultural produce market committee : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Agricultural produce market committee) रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या बाजार समित्या खूप महत्वाच्या आहेत. बाजार समित्यांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय? याबाबत शेतमाल बाजार अभ्यासक दिपक चव्हाण यांच्याशी एबीपी माझानं (ABP Majha) संपर्क साधला. यावेळी दिपक चव्हाण (Deepak Chavan) यांनी बाजार समित्यांमधील महत्वाची 'पंचसुत्री' सांगितली आहे.  


बाजार समित्यांमधील महत्वाची पंचसुत्री


1) बाजार समित्यांमुळं कुठल्याही शेतमालाची एक बेंचमार्क प्राईस म्हणजे योग्य भाव काय हे शेतकऱ्यांना कळते, ज्याला इंग्रजीत प्राईस डिस्कव्हरी म्हणतो. त्या प्रक्रियेत बाजार समित्यांना महत्त्व अधिक अधोरेखित होते. आज आयटीच्या युगात शेतकरी चार बाजार समित्यांतील बाजारभाव पाहून आपल्या मालाची किंमत ठरवू शकतो.


2) सर्व प्रकारच्या आवकेचे समायोजन : आज प्रक्रियादार केवळ त्यांना हवा त्याच गुणवत्तेचा माल घेतात. बाजार समित्यांत मात्र उत्कृष्ट गुणवत्तेपासून ते अगदी दोन किंवा तीन नंबरच्या मालाची सुद्धा विक्री करता येते. आजही आपण शिवार खरेदीत क्रमांक एकचा माल व्यापाऱ्याला देतो, पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाच्या मालास बाजार समिती शिवाय पर्याय नसतो.


3) अचानक हंगामी आवक वाढली तर प्रक्रियादार हवा तेवढा माल घेवून खरेदी बंद करु शकतो, पण बाजार समित्यांत आजही सिजनल सप्लाय ग्लट किंवा अतिरिक्त हंगामी आवकेचे समायोजन होते. 


4) पेमेंटची हमी : शिवार खरेदीत व्यापाऱ्यांकडून फसवणुकीच्या बातम्या नेहमी आपण वाचतो. आजही बाजार समित्या उशिरा का होईना पण पेमेंटची हमी देतात. एका प्रकारे फसवणुक टळते.


5) प्रक्रियादारांना स्पर्धा किंवा मोनोपॉलीपासून संरक्षण-आज थेट एंड युजर्स किंवा कारखाने थेट खरेदी करतात. उद्या जर शंभर टक्के प्रक्रियादार खरेदी करू लागले तर मोनोपॉली होवू शकते. अशा स्थिती बाजार समित्यांचा पर्याय महत्त्वपूर्ण ठरतो. प्रक्रियादारांना एका प्रकारे स्पर्धा होते. निर्यातदार, स्टॉकिस्ट, छोटे व्यापारी यांच्यामाध्यमातून एक स्पर्धा तयार होते आणि पर्यायाने शेतकऱ्याला योग्य भाव मिळण्यास मदत मिळते.


अशा पाच मुद्द्यांच्या आधारे शेतमाल बाजार अभ्यासक दिपक चव्हाण यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं महत्व सांगितलं आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा योग्य दर ठरवण्यासाठी बाजार समित्यांचा खूप उपयोग होते.  


महत्त्वाच्या बातम्या:


APMC : कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं महत्व काय? त्याच्यावर राजकारण्यांचा डोळा का? वाचा सविस्तर...