Akola Farmers News : अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सोन्याचा भाव मिळाला आहे. कापसाला 11 हजार रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. इतिहासात प्रथमच एवढा उच्चांकी दर कापसाला मिळाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. अवकाळी पावसामुळे कापसाच्या पिकाला धक्का बसला होता. त्यामुळे यंदा उत्पादन घटलं आहे. परिणामी कापसाला एवढा उच्चांकी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'. कापसाच्या भावानं आता प्रती क्विंटल 11 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत काल कापसाला क्विंटलला तब्बल 11 हजारांचा भाव मिळाला आहे. हा कापसाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक आणि विक्रमी असा भाव आहे. अलिकडच्या काही वर्षांत कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळी, ओला दुष्काळ आणि नापिकीच्या फेऱ्यात हे आश्वासक चित्र उभं राहिलं आहे. यावर्षीच्या हंगामातील कापसाला मिळत असलेल्या भावानं शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद अन उमेदीची नवी पालवी फुलली आहे. 'यावर्षी सीसीआयनं कापसाच्या मध्यम धाग्याला 5775 तर लांब धाग्याला 6100 एवढा हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे अकोटमध्ये हमीभावापेक्षा क्विंटलमागे जवळपास 5 हजार अधिक भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.
कापूस भाववाढीचा 'अकोट पॅटर्न'
सध्या अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात कापसाच्या गाड्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. कापूस विक्रीच्या लिलावात चढ्या भावानं बोलली जाणारी बोली हे येथे अलीकडच्या दशकभरात कापसासंदर्भात असं आश्वासक चित्र अभावानच पहायला मिळतं आहे. बोंडअळी, अतिवृष्टी आणि नापिकीमुळे गेल्या अनेक वर्षांत कापूस हंगाम काळवंडला होता. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी कायम सैरभैर अवस्थेतच असायचा. मात्र, यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच आनंद फुलला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत आपला कापूस विकायला आणलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतो आहे. कारण, त्याच्या कापसाला प्रति क्विंटल अकरा हजारांपर्यंत भाव मिळतो आहे.
अमरावती विभागातील अकोल्यासह अमरावती, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आपला कापूस अकोटमध्ये विकायला आणत आहेत. त्यामुळे सध्या अकोटच्या बाजारपेठेत सध्या दररोज साडेतीन ते चार हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. त्यामुळे शेतकरी अकोटमध्ये कापूस विकायला प्राधान्य देत आहेत. काल या भावानं अकरा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अकोटमध्ये कापसाला मिळत असलेल्या चांगल्या भावामूळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधनाचं हसू आलं आहे.
हमीभावापेक्षा 5 हजारांपर्यंत मिळत आहे अधिक दर
यावर्षी सीसीआयनं कापसाच्या मध्यम धाग्याला 5775 तर लांब धाग्याला 6100 एव्हढा हमीभाव जाहीर केला आहे. त्यामूळे अकोटमध्ये हमीभावापेक्षा क्विंटलमागे 5 हजार रूपयांपेक्षा अधिक भाव शेतकऱ्यांंना मिळतो आहे. यासोबतच अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर बाजार समित्यांच्या तुलनेत हजार रूपयांपर्यंत अधिक दर मिळतो आहे.
काय कारणं आहे?
अकोट बाजार समितीत दरवर्षीच इतर बाजार समित्यांपेक्षा कापसाला अधिक दर मिळतो. अकोट बाजार समितीत सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत कापसाचा लिलाव केला जातो. कापूस विकल्यानंतर शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून लगेच पावती अन संबंधित रकमेचा धनादेश दिला जातो. ही संपूर्ण प्रक्रीया बाजार समितीच्या पुढाकारानं होत आहे. यामूळे शेतकरी विश्वासानं आपला कापूस अकोटच्या बाजार समितीत आणत आहेत. अकोटमध्ये कापसाला अधिक दर मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे अकोटमध्ये जिनिंगचे तब्बल 20 युनिट आहेत. येथील जिनिंगला दररोज 15 हजार क्विंटल कापसाची आवश्यकता पडते. अकोट बाजार समितीत कापूस खरेदी केल्यानंतरही या युनिट्सला बाहेरून कापूस खरेदी करावा लागतो.
या भागातील कापसांच्या गाठीची चीन आणि बांग्लादेशात निर्यात
अकोटचा समावेश असलेल्या वऱ्हाडातील कापसात रूईचे प्रमाण अधिक आणि सरकीची जाडी कमी. यामूळे बाजारात या कापसाला चांगलीच मागणी आहे. याच कारणामूळे आंतरराष्ट्रीय बाजारात या भागातील कापसाला चांगली मागणी आहे. यामूळे येथील कापूस पुढे बांग्लादेश आणि चिनमध्येही निर्यात होतो.
पुढच्या काही दिवसांत कापसाचे दर 12 हजारांचा टप्पा ओलांडणार
कापूस बाजारात सध्या मोठी तेजी आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे कापसाचा कमी झालेला पेरा आणि वाढलेली मागणी. त्यामूळे कापुस बाजारातील सध्याच्या तेजीचा रोख बघता लवकरच कापूस प्रति क्विंटल 12 हजारांचा टप्पा सहज ओलांडणार, अशी शक्यता कापूस क्षेत्रातील तज्ञ आणि अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
'कापूस कोंड्याची गोष्ट' म्हणून कापसाच्या पिकाची गेल्या दोन दशकांत चांगलीच अप्रतिष्ठा झाली आहे. सरकारी धोरणं, योग्य बाजारभाव अन बाजारातील विक्री-लिलाव पद्धतीत पारदर्शकता आणली तर हे पांढरं सोनं पून्हा चकाकू लागेल. शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव देत त्यांच्या श्रमाचे मोल करणारा या 'अकोट पॅटर्न'चं इतर ठिकाणीही अनूकरण होवो, हिच सदिच्छा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha