Agricultutre News : शेतातील पाणीसाठ्यावर रब्बी हंगामातील (Rabi Season) पिके जोपासली जातात. मात्र, यंदा पेरणीच्या वेळीच जमिनीत ओल नसल्यानं भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार, हे निश्चित होते. मात्र, आशादायी शेतकऱ्यांनी (Farmers) पेरणी केली. आता पिकांची उगवण झाली असताना विहीर, बोअरलने तळ गाठला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत. प्रकल्पातून पाणी मिळणं अवघड झालं आहे. त्यामुळं पिके कशी जोपासली जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. लातूर जिल्ह्यातील दोन लाख 50 हजार हेक्टरवरील रब्बी पिके धोक्यात आली आहेत. 


पान चिंचोली येथील शेतकरी विजय जाधव यांनी आपल्या पाच एकर शेत जमिनीवर सोयाबीन लावलं आहे. ज्याच्यामध्ये त्यांना आर्थिक फटका बसला होता. रब्बी हंगामात नुकसान भरपाई निघेल या आशेवर हरभरा पेरला, पिकेही उगवली आहेत. मात्र, पाण्याअभावी पिकं मान टाकत आहेत. शासन दरबारी रब्बी पेरणीच्या टक्केवारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी, प्रत्यक्ष बांधावरची स्थिती ही वेगळीच आहे. जमिनीतील ओल उडून जाईल, या भीतीने खरीप पिकांची काढणी होताच मशागत न करता शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली होती. जिल्ह्यात सरासरीच्या 80 टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद आहे. दोन लाख 50 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरले ते उगवतेच, पण उगवलेल्या या पिकातून उत्पादन पदरी पडणार की नाही, अशी स्थिती आहे. पाण्याअभावी उगवण होताच पिकांनी माना टाकल्या आहेत. हंगामी नाही किमान अवकाळी पाऊस तरी तारेल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र प्रतिकूल वातावरणामुळे रबीची आशा धुसर झाली आहे.


हरभरा आणि ज्वारी वाया जाण्याच्या मार्गावर


यावर्षी पावसानं प्रमाण कमी आहे. बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.  यामुळं विहीर आणि बोर यांनी देखील तळ गाठला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वच प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प आहे. यामुळं प्रशासनानं या ठिकाणी पाण्याच्या मोटरी लावण्यासाठी बंदी घातली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. आता पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी रब्बीची पिकंही जाण्याची भीती आता स्पष्ट आहे. पानचिंचोलीतील आत्माराम जगताप या शेतकऱ्याने आपल्या चार एकर शेतात हरभरा आणि ज्वारी पेरली आहे. मात्र पाण्याअभावी त्यांची पिकं वाया जात आहेत. 


जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण


खरिपात पावसाने दगा दिला. रब्बीतबी ही तिच परिस्थिती आहे. निदान चांर्‍यापुरतं काहीतरी हाती लागेल अशी आशा होती. ती देखील आता धूसर होत आहे. पिकांना पाणी नाही. प्यायला पाणी नसण्याची स्थिती निर्माण होत आहे. जनावरांनाही चारा उपलब्ध होण्याची स्थिती सध्या नाही. अशा परिस्थितीत लातूर जिल्ह्यातील दोन लाख पन्नास हजार हेक्टरवर शेती करणारा बळीराजा संकटात सापडला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


लातूर जिल्ह्यातील 25 गावचे शेतकरी एकवटले, जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह ट्रॅक्टर मोर्चा