Success Story: एखाद्या इंजिनीयरला दरमहा मिळणाऱ्या पगाराची तुलना शेतकऱ्याच्या आठवड्याच्या कमाईशी होऊ शकते ? पुण्यातील दौंड तालुक्यातील यवत मधल्या एका शेतकऱ्याने अर्ध्या एकरात 'तलवार' जातीच्या मिरचीची लागवड करत आठवड्याला सरासरी 30,000 रुपयांची कमाई केली आहे . अवघ्या अर्ध्या एकरावर मिरचीची लागवड करून उल्लेखनीय यश या शेतकऱ्याला मिळालाय .बाजारातील अनुकूल परिस्थितीमुळे या कुटुंबाला मिरचीतून चांगलं उत्पन्न मिळालंय .


भाजीपाल्यातून आर्थिक फायदा साधला


पांडुरंग लकडे हा शेतकरी भाजीपाला पिकातून उत्पन्न कमावतो . टोमॅटो, काकडी , वांगी , फुलकोबी या पिकांसह काही क्षेत्रावर झेंडूही या शेतकऱ्यांना लावलाय . सेंद्रिय खतांचा वापर करत वैज्ञानिक सिंचन पद्धती लागू करून  काटेकोर अंमलबजावणीकरत या शेतकऱ्याला मिरची पिकांना बळ दिलय . पांडुरंग लकडे यांनी  पारंपरिक पिकांच्या उत्पादनातून मिळणाऱ्या लाभापेक्षा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून एकरभराहुनही कमी  क्षेत्रावर अधिक फायदा मिळवून देणाऱ्या तलवार या जातीच्या मिरचीची लागवड केली . या मिरचीच्या प्रत्येक कापणीतून आता लकडे कुटुंबीयाला लक्षणीय नफा मिळतोय . या मिरचीतून दर आठवड्याला अंदाजे 30 हजार रुपये ते कमवतात .  


सेंद्रिय खतांचा वापर, पिकांची काटेकोर काळजी


पांडुरंग लकडे यांच्या कुटुंबात शेती हाच पिढ्यान पिढ्या चालणारा व्यवसाय आहे . त्यांची उपजीविकाच शेतीवर असल्याने जपून पण सेंद्रिय आणि आधुनिक शेतीतून संपूर्ण कुटुंब चांगला फायदा मिळवत आहे . काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत अनेक पिकांचे नुकसान झालं असलं तरी खचून न जाता पांडुरंग लकडे यांनी मिरचीवर रिस्क घेत चांगला नफा कमवलाय . द ब्रिज क्रोनिकल ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी वैज्ञानिक सिंचन पद्धती लागू करून सेंद्रिय खतांचाही योग्य वापर केल्याने हा फायदा झाल्याचं सांगितलं .  अतिवृष्टीचा पाऊस ओसरल्यानंतर पीक कापण्यासाठी तयार होते .अनुकूल हवामानाला योग्य होते त्यामुळे मिरचीतून भरघोस उत्पन्नही मिळालं आणि नफाही मिळवल्याचं ते सांगतात . शेती हाच उपजीविकेचा विश्वासार्ह स्त्रोत असल्याचं त्यांच्या कुटुंबातील सदस्यही सांगतात .


पांडुरंग लकडेंचं संपूर्ण कुटुंब शेतीत


अनेक तरुण नोकरी किंवा व्यवसायाकडे वळताना दिसत असले तरी पांडुरंग लकडे यांचा संपूर्ण कुटुंब शेतीमध्ये एकवटला आहे . त्यांचे दोन्ही मुलं सुना आणि संपूर्ण कुटुंब शेतात काम करतात . पिकांची निगराणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ आणि हवामानाशी सांगड घालत केलेलं नियोजन हे त्यांच्या यशाचे गमक असल्याचं ते सांगतात .


मिरचीतून नफा कमवायचा असेल तर ..


मिरची पिकातून चांगला नफा कमवायचा असेल तर मिरचीच्या उत्पादनासाठी योग्य जमीन कोणती तसेच मातीचा पोत काय हे अत्यंत गरजेचे आहे . मिरची लागवडीसाठी उबदार किंवा थोड्याशा कोरड्या हवामानाची आवश्यकता असते . 20 ते 30 अंश सेल्सिअस हे तापमान मिरचीच्या वाढीसाठी योग्य समजले जाते . पांडुरंग लकडे यांचा उदाहरणावरून योग्य प्रकारे मिरचीची लागवड, चांगल्या प्रतीचे बियाणं, योग्य नियोजन आणि हवामानाची अनुकूलता यांची सांगड महत्त्वाची ठरते .