Agriculture News : अतिवृष्टीमुळं बाधित असलेल्या मात्र, निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून 755 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचा राज्यातील अंदाजे पाच लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जून ते ऑगस्ट कालावधीतील अतिवृष्टीमुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत 4 हजार 500 कोटी रुपयांच्या निधीचं वाटप


नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन आणि अप्पर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी अतिवृष्टीमुळं बाधित असलेल्या मात्र, निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे. नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत राज्य सरकारनं अंदाजे 4 हजार 500 कोटी रुपयांच्या निधीचं वाटप केले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी 1 हजार 500 कोटी रुपये राहिली असती. निकषापलिकडं जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळं राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. 


पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार


काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील 4 लाख 38 हजार 489 हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील 36 हजार 711.31 हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील 74 हजार 446 हेक्टर असे एकूण 5 लाख 49 हजार 646.31 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे 755 कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक  शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 


अंदाजे 36 लाख शेतकऱ्यांना दिलासा


आतापर्यंत सुमारे 3 हजार 900 कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे. काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे 30 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. हे 30 लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या 755 कोटीच्या निधीमुळं अंदाजे 36 लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळं मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 


आतापर्यंत सुमारे 3 हजार 954 कोटी रुपयांचा मदत निधी वितरित


राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून शासनास प्राप्त झाले होते. त्यानुसार 8 सप्टेंबर 2022 रोजी सुमारे 3445.25 कोटी आणि 56.45 कोटी इतका निधी नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास 98.58 कोटी तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार 354.07 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.



मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाचा या जिल्ह्यांना मिळणार लाभ


● औरंगाबाद – 12 हजार 679 हेक्टर 
● जालना- 678 हेक्टर क्षेत्र
● परभणी-2545.25 हेक्टर क्षेत्र
● हिंगोली- 96677 हेक्टर क्षेत्र
● बीड- 48.80 हेक्टर क्षेत्र
● लातूर- 213251 हेक्टर क्षेत्र
● उस्मानाबाद- 112609.95 हेक्टर क्षेत्र
● यवतमाळ- 36711.31 हेक्टर क्षेत्र
● सोलापूर-74446 हेक्टर क्षेत्र


एकूण क्षेत्र : 5 लाख 49 हजार 646.31 हेक्टर क्षेत्र
एकूण निधी : सुमारे 755 कोटी रुपये


महत्त्वाच्या बातम्या: