मुंबई: इतिहासात आजचा दिवस (On This Day In History 30th September In History) महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी, 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरमध्ये (Latur Earthquake) मोठी भूकंप झाला होता. त्यामध्ये हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच आजच्याच दिवशी जोधपुरातील एका मंदिरात गोंधळ माजला आणि त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. 


1687- औरंगजेबने गोवळकोंडा किल्ला ताब्यात घेतला 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दक्षिण जिंकायला निघालेल्या मुघल बादशाह औरंगजेबने पहिला हल्ला कुतुबशाहवर केला. 30 सप्टेंबर 1687 साली औरंगजेबने गोवळकोंडा (Golconda Fort) हा किल्ला जिंकला. 11 व्या शतकात वरंगलचा राजा काकतिया प्रतापरुद्रने गोवळकोंडा या ठिकाणी मातीचा किल्ला बांधला. 14 व्या शतकात वरंगलच्या लढाईत बहमनी सुलतानाच्या तो ताब्यात आला.


1993- लातूर भूकंपमध्ये 10 हजार लोकांचा मृत्यू 


महाराष्ट्रातल्या लातूर या ठिकाणी 30 सप्टेंबर 1993 रोजी मोठा भूकंप (Latur Earthquake) झाला. या भूकंपामध्ये 10 हजार लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 16 हजार लोक जखमी झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 3.56 वाजता लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस 70 किमी अंतरावर होते. 6.04 रिश्टर स्केलच्या या भूकंपामध्ये या परिसरातील 52 गावांतील 30 हजार घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर 13 जिल्ह्यांतल्या 2 लाख 11 हजार घरांना तडे गेले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना ह्या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला. या दोन तालुक्यांतील एकूण 52 गावे उद्‌ध्वस्त झाली. 


1996- मद्रासचे नाव चेन्नई झालं 


तामिळनाडूची राजधानी मद्रास या शहराचं नाव 30 सप्टेंबर 1996 रोजी बदलण्यात आलं. या शहराचं नाव चेन्नई (Chennai) असं करण्यात आलं. 


2008- जोधपूरच्या मंदिरात अफवेमुळे चेंगराचेंगरी, 224 लोकांचा मृत्यू 


30 सप्टेंबर 2008 रोजी जोधपूरच्या (Jodhpur) एका मंदिरात बॉम्ब असल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 224 लोकांचा मृत्यू झाला. 


2009- इंडोनेशियातील भूकंपामध्ये 1100 लोकांचा मृत्यू 


30 सप्टेंबर 2009 रोजी पश्चिम इंडोनेशियामध्ये (Indonesia Earthquake)  भूकंप झाला आणि त्यामध्ये 1100 लोकांचा मृत्यू झाला होता.