Agriculture News : राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस (unseasonal rains) आणि गारपीटीनं थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. धाराशीव जिल्ह्यातील वाडीबामणी (Wadibaman) या गावातील बाबासाहेब अशोक उबरदंड या शेतकऱ्याचे एका तासात तब्बल 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. गारपीटीमुळं ड्रॅगन फ्रुटसह टरबूज आणि ऊसाच्या पिकाचं नुकसान झालं आहे. तसेच शेतात ठेवलेल्या सोयाबीनसह हरभरा देखील पाण्यात भिजलं आहे. 


मागील 25 ते 30 वर्षापूर्वी अशी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यानंतर आत्ताच अशी परिस्थिती झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. अचानक वेगानं वारं सुचलं. यामुळं पत्रे उडायला लागले होते. त्यानंतर पाऊस आणि गारपीट सुरु झाल्याचे शेतकरी  बाबासाहेब अशोक उबरदंड आणि त्यांच्या पत्नी साधना बाबासाहेब उबरदंड यांनी सांगितले. एका तासाभरापूर्वी भारी दिसणार टरबुजाचं पिकं क्षणात उध्वस्त झाल्याची माहिती उबरदंड यांनी दिली. जवळपास पाऊणतास गारपीट झाली. यामध्ये टरबुजासह ड्रॅगन फ्रुट आणि ऊसाचं मोठं नुकसान झाल्याचं उबरदंड यांनी सांगितलं. कर्ज काढून हे पिकं उभारलं होतं. मुलांच्या शिक्षणाचा मोठा खर्च आहे. अशातच हे अस्मानी संकट आल्यानं शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आल्याचं पाहायला मिळालं.


बँकेचं कर्ज काढून शेती, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा?


बँकेचं कर्ज काढून आम्ही ड्रॅगन फ्रुटची शेती करत होतो. तसेच बँकेत सोनं देखील गहान ठेवलं आहे. अशातच हे संकट आल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. शिक्षणासाठी आता पुढे पैसे नाहीत. एक मुलगी इंजीनियरिंग आहे. एकीची दहावी झाली आहे. तसेच मुलगा बी एस्सी अॅग्री करत आहे. आता या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा असा प्रश्न उबरदंड कुटुंबापुढे उभा राहिला आहे. 


सहा एकर ज्वारी पाण्याखाली


या अवकाळी आणि गारपीटीमुळं जवळपास 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. दोन एकरमध्ये ड्रॅगन फ्रुटचे 10 टन  उत्पादन काढण्याचे ठरवले होते. 150 रुपयांचा दर मिळाला असता तरी 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असते असे शेतकरी उबरदंड यांनी सांगितले. सहा एकर ज्वारीत सगळीकडे पाणी आहे. तीन एकर ऊसात पाणी आहे, तर दोन एकर कलिंगड वाया गेल्याचे उबरदंड यांनी सांगितले. सात ते आठ लाख रुपयांचे कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या:


CM Eknath Shinde: अहमदनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद