Rabi Crop Damaged : धुळे (Dhule) शहरासह जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि वादळी वाऱ्याचा फटका रब्बी हंगामाच्या पिकांना (Rabi Crop) बसला आहे. कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या पाहणीतून धुळे तालुक्यातील तब्बल 11 गावांमधील 353 शेतकऱ्यांच्या 250 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना याचा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.


गहू, हरभरा, कांदा, मका पिकासह फळबागांचं नुकसान


धुळे तालुक्यातील नेर देऊळ परिसरात सोमवारी (30 जानेवारी) सायंकाळी अवकाळी आणि वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात गहू, हरभरा, कांदा, मका, सोयाबीन आणि फळबागा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एकीकडे शेतीमालाला हमीभाव मिळत नसताना दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 


250 हेक्टर क्षेत्रावरील गहू आणि मका पिकांचं नुकसान


कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या पाहणीत धुळे तालुक्यातील 11 गावांमधील 232 शेतकऱ्यांचे 228 हेक्टरवरील गहू आणि 30 शेतकऱ्यांचे 22 हेक्टरवरील मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाने ही प्राथमिक आकडेवारी जाहीर केली असून यात वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील दोन दिवसात नुकसानीचा पूर्ण अहवाल शासनाकडे सादर केला जाणार असून पंचनामा सुरु करण्यात आला आहे. 


काढणीला आलेली पिके भुईसपाट


अवघ्या काही दिवसांवर गहू, हरभरा, मका ही पिके काढणीला आली असताना अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे उभे पीक आडवे झाले. परिणामी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी झाले असले तरी धुक्याचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच आता पावसामुळे गहू, हरभरा, मका आणि कांदा पीक भुईसपाट झाले आहे.


ढगाळ वातावरण आणि बेमोसमी पावसामुळे नंदुरबारमध्ये रब्बी पिकांना फटका


नंदुरबारमध्येही ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे तर दुसरीकडे नवापूर तालुक्यात जोरदार वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरण आणि दाट धुके याचा परिणाम रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर होत असून हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. दुसरीकडे गहू आणि ज्वारी पिकावर वेगवेगळ्या वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन घटनेचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. नवापूर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे सुरु न झाल्याने शेतकऱ्यांनी पंचनामे करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.


हेही पाहा