Agriculture News : तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर अमेरिकेला (America) प्रायोगिक तत्वावर डाळिंबांची निर्यात (Pomegranate Export) करण्यात आली आहे. डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे 2018 पासून अमेरिकेने भारतीय डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर केंद्र सरकार, प्लांट क्वारंटाइन, इंडिया यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा केल्यानंतर 2022 पासून निर्यातबंदी उठवली होती. त्यानंतर काही नियम आणि अटी घातल्या होत्या. त्यानंतर डाळिंबाच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळं आाता डाळिंबाची 450 किलो डाळिंब विमानाने न्यूयॉर्कला पाठवण्यात आले आहे.


कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था (एनपीपीओ), महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि आय.एन.आय फार्म प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन अपेडाच्या महाव्यवस्थापक विनिता सुधांशू  यांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर अमेरिकेला डाळिंब निर्यातीचा शुभारंभ करण्यात आला. या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल असा विश्वास श्रीमती सुधांशू यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाला अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, संचालक तरुण बजाज, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे डॉ. आर. ए. मराठे, अपेडाचे सरव्यवस्थापक यु. के. वत्स, प्लॅंट प्रोटेक्शन ॲडवायजर जे. पी. सिंग, विकिरण सुविधा केंद्राचे प्रमुख सतिश वाघमोडे आदिंसह अधिकारी व निर्यातदार उपस्थित होते.


अमेरिका देशाने भारतातून डाळिंबाची आयात करण्यास बंदी घातली होती 


डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं अमेरिका देशाने भारतातून डाळिंबाची आयात करण्यास 2017-18 मध्ये बंदी घातली होती. अपेडा आणि एन.पी.पी.ओ. भारत सरकार यांनी संयुक्तरित्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी वारंवार चर्चा केली असता मानकांच्या आधारे 2022 मध्ये निर्यात बंदी उठवण्यात आली होती. डाळिंब फळाविषयी निश्चित केलेल्या मानकानुसारच्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे भाजीपाला प्रक्रिया केंद्र, वाशी, नवी मुंबई येथील सुविधा केंद्रावरुन डाळिंबाचे 150 खोके (450 किलो) अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे हवाईमार्गे पाठवण्यात आल्याची माहिती उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी दिली आहे.


भारतीय डाळिंबाला अमेरिकेत मोठी मागणी 


भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अॅन्टीऑक्सीडंट आहेत. तिथल्या त्वचेच्या विकारांवरील उपचारासाठी असणाऱ्या मार्गदर्शक डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं अमेरिकेत डाळिंबाला मोठी मागणी आहे. भारतीय डाळिंबाला अमेरिकेची बाजारपेठ उपलब्ध झाल्यानं डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे अपेडाचे मुंबई प्रादेशिक विभागाचे उपमहाव्यवस्थापक यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या:


परतीच्या पावसातून वाचलेलं डाळींब थेट बांगलादेशला, मात्र, आयात करात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना फटका