Piyush Goyal : भारतीय अन्न महामंडळात (Food Corporation of India) जलद गतीनं परिवर्तन करणं गरजेचं आहे. जेणेकरुन ही संस्था देशातील लोकांना गरिबांना आणि शेतकऱ्यांना मदत करत राहील असे मत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी व्यक्त केले. एफसीआयमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात कठोर धोरण राबवणार असल्याचेही गोयल म्हणाले. एफसीआयच्या (FCI) 59 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात गोयल बोलत होते.
दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांनी प्रत्येक आठवड्याला FCI आणि सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (CWC) अर्थात केंद्रीय वखार महामंडळाच्या होणाऱ्या परिवर्तनावर लक्ष ठेवण्याचे निर्देश गोयल यांनी दिले. तसेच प्रत्येक पंधरवड्याला त्याबाबतच्या स्थितीची माहिती आपल्याला देण्याचे निर्देशही दिले. या परिवर्तन प्रक्रियेला सहकार्य न करणाऱ्या किंवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी भूमिका देखील गोयल यांनी घेतली.
भ्रष्टाचारात गुंतलेल्यांची गय केली जाणार नाही
FCI मधील भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणांविरुद्ध सुरू असलेल्या तपासाबाबत देखील गोयल यांनी प्रतिक्रिया दिली. संस्थेसाठी हा एक सावधानतेचा इशारा देणारा काळ आहे. भ्रष्ट व्यवहारात गुंतलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. FCI भ्रष्टाचाराबाबत दूर राहील असेही गोयल म्हणाले.
कोरोना संकटात जगातील सर्वात मोठी अन्न पुरवठा साखळी
गोयल यांनी सचिवांना संस्थात्मक यंत्रणा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामध्ये व्हिसलब्लोअर्सना म्हणजेच भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघडकीला आणणाऱ्या जागल्यांना पुरस्कृत करता येऊ शकेल. भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी FCI च्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले. 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने' (PMGKAY) अंतर्गत अन्नधान्याचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, विशेषत: महामारीच्या काळात, FCI ने जगातील सर्वात मोठी अन्न पुरवठा साखळी प्रणाली ज्याप्रमाणे राबवली त्याबाबत गोयल यांनी FCI चे अभिनंदन केले. कोरोनाच्या संकटात देशात कोणीही उपाशी झोपला नाही. अन्न सुरक्षा, आर्थिक परिस्थिती मजबूत करणे, महागाई नियंत्रित करणे आणि इतर क्षेत्रात भारताने जगासमोर उदाहरण ठेवल्याचे गोयल यावेळी म्हणाले. या यावर्षी तांदूळ खरेदीचे आकडे चांगले आहेत. येत्या हंगामात चांगल्या गहू खरेदीची देखील अपेक्षा असल्याचे गोयल म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: