Maharashtra Agriculture Success Story : शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट सुरुच असतात. पण या संकटावर मात करुनही काही शेतकरी उत्तम प्रकारची शेती (Good farming) करताना दिसत आहेत. योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं भरघोस उत्पादन घेत आहेत. अशाच एका युवा शेतकऱ्यानं सव्वा एकर पपईच्या शेतीतून (Papaya Farming) आत्तापर्यंत तब्बल 23 लाखांचे उत्पन्न घेतलं आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील कुंडल (Kundal) येथील प्रतिक पुजारी (Pratik Pujari) असं या 25 वर्षीय युवा शेतकऱ्याचं नाव आहे. नेमकं त्यांनी एवढं भरघोस उत्पादन कसं घेतलं? त्यांनी पपई शेतीचं नेमकं नियोजन कसं केलं? याबाबतची माहिती पाहुयात....
पपईच्या 1 हजार 100 झाडांची लागवड
प्रतिक पुजारी हे सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे शेतकरी. त्यांनी त्यांच्या सव्वा एकरवर क्षेत्रावर पपईची लागवड केली आहे. या सव्वा एकरमध्ये जवळपास 1 हजार 100 पपईची झाडे लावली आहेत. पपईची बाग लावून त्यांना दोन वर्ष झाली. या पपईचे गेल्या 18 महिन्यापासून उत्पादन सुरुच आहे. आत्तापर्यंत 210 टन पपईचे उत्पादन निघाल्याची माहिती प्रतिक पुजारी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. या उत्पादनातून 23 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे प्रतिक पुजारी यांनी सांगितले. मी '15 नंबर' या पपईच्या वाणाची लागवड केली होती. त्यामधून भरघोस उत्पादन निघाल्याचे प्रतिक पुजारी म्हणाले.
किलोला 9 ते 28 रुपयापर्यंतचा दर मिळतोय
आत्तापर्यंत सव्वा एकर पपईच्या शेतीतून 210 टन उत्पादन मिळालं आहे. आणखी 30 टन उत्पादन निघण्याची शक्यता असल्याची माहिती प्रतिक पुजारी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. सर्व पपईची विक्री ही मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये झाली आहे. पपईला चांगली मागणी असल्यामुळं आम्हाला फायदा झाला. इतरांच्या पपईपेक्षा आमच्या पपईला वजन जास्त भरत होते. त्याचा आम्हाला फायदा झाल्याचं प्रतिक पुजारी यांनी सांगितलं.
कसं केलं नियोजन?
या पपईच्या शेतीसाठी रासायनिक तसेच सेंद्रीय खतांचा वापर केला.
जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढवला
पिकांची फेरपालट केली
पपईच्या लागवड करण्यापूर्वी मातीचं परिक्षण केलं
पाण्याचे योग्य नियोजन केले.
ड्रीप पद्धतीनं बागेला पाणीपुरवठा
बागेसाठी सर्व औषधे ही एस व्ही अॅग्रो कंपनीची वापरली.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला
योग्य नियोजन आणि चांगल्या दराचा फायदा : कृषी सहाय्यक
प्रतिक पुजारी यांच्या पपई शेतीबाबत कुंडलचे कृषी सहाय्यक सलगर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ झालं त्यांची पपई मार्केटमध्ये चालू आहे. त्यांच्या पपईला बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे. त्यामुळं पुजारी यांना चांगला नफा मिळाल्याची माहिती कृषी सहाय्यक सलगर यांनी दिली. तसेच सध्या पपईला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मागणी वाढत असल्यानं दरात वाढ झाल्याचे सलगर म्हणाले. पपईच्या 15 नंबर वाणाला बाजारात चांगली मागणी आहे. तसेच यावर रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात होतो. पण शेतकऱ्यांनी मार्केट बघून पपईचे उत्पादन घ्यावं असेही सलगर म्हणाले. सलगर यांचा माल व्यापारी जागेवरुन उचलत असल्यानं त्यांना चांगला फायदा झाल्याचे सलगर म्हणाले. प्रतिक पुजारी यांनी त्यांच्या पपई बागेचं योग्य नियोजन केल्यामुळं त्यांना भरपूर नफा मिळाल्याचे सलगर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Success Story : गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा