Maharashtra Kustigir Parishad : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत (Sharad Pawar) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. बृजभूषण सिंह यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांनी सामोपचाराने मिटवला. त्यानंतर आता शरद पवार आणि बृजभूषण सिंह हे दोघे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी एकाच मंचावर येणार आहेत.  


पुण्यात 11 ते 15 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 जानेवारीला होणाऱ्या अंतिम लढतीसाठी येण्याचं आमंत्रण बृजभूषण सिंह यांनी आमंत्रण स्वीकारलं आहे. त्यासाठी 14 जानेवारीलाच ते पुण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद मिटवताना भाजपचे खासदार रामदास तडस यांना कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बनवण्यात आलं. तर शरद पवार या परिषदेचे चीफ पेट्रेन अर्थात मुख्य आश्रयदाते तर बाळासाहेब लांडगे पेट्रेन असणार आहेत.  


मनसे कोणती भूमिका घेणार?


बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जून महिन्यातील अयोध्या दौऱ्याला त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे आयोध्येला जाऊ शकले नव्हते. त्यावेळी बृजभूषण सिंह आणि राज ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाले होते. मनसेने त्यांच्या भूमिकेचा विरोध केला होता. आता बृजभूषण सिंह पुण्यात येणार असून मनसे याबाबत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.


अखेर वादाला पूर्णविराम
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद काही दिवसांपूर्वी भारतीय कुस्ती संघाकडून बरखास्त करण्या आली होती. त्यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी नेमण्यात आली. मात्र बाळासाहेब लांडगे यांनी या बरखास्तीला न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयाने देखील बरखास्तीला स्थगिती दिली आणि त्यानंतर या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपणच भरवणार, असा दावाही दोन्ही बाजूंकडून करण्यात आला होता. बाळासाहेब लांडगे यांनी डिसेंबर महिन्यात अहमदनगरमधे तर रामदास तडस गटाकडून जानेवारीत महिन्यात पुण्यात ही स्पर्धा होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे नक्की कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायचं यावरुन पैलवानांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांनी अखेर तोडगा काढला. आता परिषदेच्या सचिवपदाचा बाबासाहेब लांडगे यांनी राजीनामा दिला असून नवी कार्यकारिणी नेमण्यात आली आहे. आता 11 ते 15 जानेवारीदरम्यान पुण्यात ही स्पर्धा रंगणार आहे.