Agriculture News : सध्या राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) पडत आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. काही भागात पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत. तर कुठं पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी नेमक्या काय उपाययोजना कराव्यात याबाबतची माहिती बीडचे (Beed) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी दिली आहे. पाहुयात ते नेमकं काय म्हणतायेत.


पावसानं खंड दिल्यानं राज्यातील बळीराजा चिंतेत आहे. उभी पिकं वाया जात आहेत. पावसाच्या खंडादरम्यान, पिकाच्या जोपासण्यासाठी कृषी विभागाच्या वतीनं काही भौतिक उपाययोजना राबवण्यासाठी कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.


1) सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आंतरमशागत करण्यात यावी, जेणेकरुन जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी मदत होऊ शकेल.


 2) पीक तणविरहीत ठेवणे, वेळोवेळी मृत सरी काही अंतरावर काढून ठेवल्यास अचानक पडलेल्या पावसामुळं जमिनीतील ओल टिकून राहण्यास मदत होऊ शकते.
 
3) रासायनिक पद्धतीनं पावसाच्या खंडांचे नियोजन करताना 13:0:45 किंवा पोटॅशियम नायट्रेट यांची 100 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाच्या पानांतून होणारे बाष्पीभवन रोखले जाऊ शकते.
         
 4) किड व रोगासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून निंबोळी अर्क या जैविक किटकनाशकाची फवारणी आठवड्यातून एकदा करावी.


 5) पावसाच्या खंडामुळे पिकांवर किड व रोगाची शक्यता गृहित धरून किटकनाशकांची फवारणी करावी.
 
6) ज्या शेतकरी बांधवांकडे संरक्षित पाणी व तुषार संच उपलब्ध आहे. त्यांनी जमिनीतील तीन ते चार इंच ओल टिकून राहिल, अशा पध्दतीने पाण्याची पिकांवर फवारणी करावी.


पावसाच्या खंडामुळे पिकांवर किड व रोगांसाठी प्रतिबंधक उपाय व पिकाला कायमस्वरुपी संरक्षित पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी वरील उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना कळकळीचे आवाहन केले आहे.


 मका, कापूस आणि सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेत घट येण्याची शक्यता


पेरणी होऊन महिना होत आलं तरी पिकांना पाणी मिळालं नाही. महिनाभर झालं पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची मका, कापूस आणि सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेत 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, पीक विमा योजनेतील मध्यहंगाम प्रतिकूलता याबाबीखाली मका, कापुस आणि सोयाबीन या पिकांचा विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई होते.


महत्त्वाच्या बातम्या:


औरंगाबादच्या वीस मंडळात 21 दिवसांचा पावसाचा खंड, 321 गावांतील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम नुकसान भरपाई