Lemon Production in India : भारतातील काही राज्यांमध्ये लिंबाचे (Lemon) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. देशातील 70 टक्के लिंबाचं उत्पादन हे सहा राज्यांमध्ये होतं. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळानं (National Fruit Production Board) दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) लिंबू उत्पादनाच्या बाबतीत भारतातील सर्व राज्यांमध्ये आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो. 
  
लिंबाचे सेवन करणं निरोगी राहण्यासाठी खूप चांगले मानले जाते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. यासोबतच यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही आढळतात. पारंपारिक शेतीपेक्षा लिंबू बागायती हा उत्तम पर्याय म्हणून शेतकरी आता विचार करु लागले आहेत. लिंबू हे असे फळ आहे, जे अन्नात वापरले जाते. आंबट चवीसाठी लोक अनेक पदार्थांमध्ये लिंबू घालतात. यासोबतच लोणचे बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो. शीतपेयांमध्ये देखील लिंबाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सध्याच्या काळात लिंबू हे एक उपयुक्त फळ बनले आहे. अन्नाव्यतिरिक्त, अनेक कॉस्मेटिक कंपन्या आणि फार्मास्युटिकल कंपन्या लिंबाचा वापर करतात.


देशातील एकूण लिंबाच्या उत्पादनापैकी 19.73 टक्के उत्पादन एकट्या आंध्र प्रदेशात


लिंबू उत्पादनात आंध्र प्रदेश देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. येथील हवामान आणि माती लिंबू लागवडीसाठी अनुकूल आहे. त्यामुळं आंध्र प्रदेशात लिंबाचे सर्वाधिक उत्पादन होते. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण लिंबाच्या उत्पादनापैकी 19.73 टक्के उत्पादन हे एकट्या आंध्र प्रदेशात होते. आंध्र प्रदेशनंतर लिंबू उत्पादनात दुसरा क्रमांक हा गुजरातचा लागतो. जिथे शेतकरी लिंबू मोठ्या प्रमाणात पिकवतात. इथे एकूण लिंबाच्या 17.80 टक्के उत्पादन होते. त्यानंतर महाराष्ट्रात 9.85 टक्के लिंबाचे उत्पादन होते. त्यानंतर कर्नाटकमध्ये 9.68 टक्के, त्यानंतर 8.61 टक्के उत्पादन मध्य प्रदेशात होते. याशिवाय, इतर राज्यात उर्वरित 30 टक्के लिंबाचे उत्पादन घेतलं जातं. 


महाराष्ट्रातही लिंबाचे दर वाढले 


सध्या देशात आणि राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत आहे. वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे लिंबाच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळं लिंबाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. देशातील आणि राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये प्रति किलोसाठी 120 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, उत्पादनात घट झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सध्या लिंबू नसल्याने बाजारपेठेत लिंबाचा तुटवडा भासत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये लिंबू उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लिंबाचे उत्पादन घटले असून, आवक कमी होत आहे. सध्या पुण्याच्या बाजारपेठेत सोलापूर, नगर आणि पुणे जिल्ह्यांतून लिंबाची आवक होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून लिंबाचे दर वाढले असून, शेतकऱ्यांना सर्वाधिक दर मिळाल्याने ते खूष आहेत. अनेक वर्षांनी त्यांना चांगले दर मिळाले आहेत. सध्या बाजारपेठेत हिरव्या लिंबाचे प्रमाण अधिक आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


High Temperatures : उन्हासारखाच लिंबाच्या दराचा तडाखा! एक लिंबू 10 ते 12 रुपयांना...