Coronavirus In Mumbai:  मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनावरील बूस्टर डोससाठी (Corona Vaccine) धोरण निश्चित करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारसह पालिका प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी करत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) करण्यात आली आहे. याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने त्यावर 27 एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे.


गेल्या वर्षी देशभरात कोरोनाची तिसरी लाट सुरू असताना ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं ही याचिका सोमवारी हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आली. करोनापासून नागरिकांचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं लसीकरण मोहीम राबवली होती. तसेच सगळ्या नागरिकांना दोन्ही लसींचे डोस मिळतील हे निश्चित केलं होतं. परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचं जाहीर करताना त्यासाठीची योजना मात्र अद्याप आखण्यात आलेली नाही. 


यासोबतच ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेलं आहे, त्यांच्यासाठीही बूस्टर डोसचे धोरण आखण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर तीन महिन्यांनी त्याची परिणामकारकता कमी होत जाते आणि नव्यानं करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढत जात, तसेच बूस्टर डोसच्या वापराची गरज तज्ज्ञांनी नोंदवल्याकडे याचिकेतून लक्ष वेधण्यात आलं आहे. बूस्टर डोसमुळे करोना संसर्गाची तीव्रता कमी होईल. तसेच कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकताही कमी भासेल, असेही याचिकाकर्त्यांनी यात म्हटलेलं आहे.


एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट


शात कोरोनाबाधितांचा (India Corona Updates) आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. शनिवारी (1 एप्रिल) रोजी देशात कोरोनाच्या (Coronavirus) 3824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दैनंदिन रुग्णांचा विचार केला तर ही 6 महिन्यांतील सर्वाधिक संख्या आहे. तसेच, गेल्या सात दिवसांत ज्या प्रकारे कोरोनाबाधितांमध्ये (Covid-19) वाढ होत आहे. ही वाढ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतरची सर्वाधिक वाढ आहे.


गेल्या आठवड्यात 26 मार्च-1 एप्रिल या कालावधीत भारतात 18,450 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जी आधीच्या आठवड्यातील 8,781 पेक्षा दुप्पट आहे. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची वेळ 7 दिवसांपेक्षा कमी राहिली आहे. गेल्यावेळी हे तिसऱ्या लाटेत घडले होते जेव्हा दैनंदिन आकडे आठवडाभरात दुप्पट होत होते. मात्र, या काळात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे 36 जणांचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी हा आकडा 29 होता.