Agriculture News in Dhule : यावर्षी राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. धुळे (Dhule) जिल्ह्याला देखील या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या (Farmers) हाती आलेली पीक पावसामुळं वाया गेली होती. मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी विधानसभेत केली आहे.
धुळे जिल्ह्यासाठी एकूण 54 कोटी 63 लाख रुपयांची मागणी
धुळे तालुक्यासह जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधित अतिवृष्टी, अवकाळीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. या कालावधीत जिल्ह्यासाठी एकूण 54 कोटी 63 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही मदत शेतकर्यांना मिळाली नाही. त्यामुळं धुळे जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळं धुळे तालुका आणि जिल्हयातील बाधित शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी आमदार कुणाल पाटील यांनी आज विधानसभेत केली.
नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवूनही मदत मिळाली नाही
धुळे जिल्ह्यासह धुळे तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी, अवकाळी पावसानं शेतकर्यांच्या पिकांचं मोठ नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकर्यांचं आर्थिक नुकसान होवून कर्जबाजारी झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना अद्याप शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. परिणामी सर्वत्र असंतोषाचे वातावरण आहे. आपल्या भाषणात आमदार कुणाल पाटील यांनी आकडेवारीसह नुकसानीची आकडेवारी सादर केली. धुळे तालुक्यात 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2022 या कालावधीत 770 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच 19 सप्टेंबर 2022 च्या अहावालानुसार 36 हजार 500 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळं बाधित झाले असल्याचे पाटील म्हणाले. या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवला असून अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे पाटील म्हणाले.
राज्यातील विविध भागात अतिवृष्टीचा फटका
अतिवृष्टीमुळं राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पीक या अतिवृष्टीनं वाया गेली होती. वाया गेलेल्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, फळबागा, भाजीपाला या पिकांचा समावेश होता. यामध्ये सर्वात मोठा फटका विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. काही ठिकाणी तर पिकांबरोबर जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या: