Rice Procurement : सध्या सरकारकडून देशभरात मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी (Rice Procurement) सुरु आहे. सरकारी आकडेवारीनुसार तीन जानेवारीपर्यंत सरकारनं 541.90 लाख टन तांदळाची खरेदी केली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत सरकारकडून 494.50 लाख टन तांदळाची (Rice) खरेदी करण्यात आली होती. यावर्षी सरकारी खरेदीत 10 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. 


आतापर्यंत सरकारनं शेतकऱ्यांकडून 541.90 लाख टन तांदळाची खरेदी केली आहे. सरकारनं याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. शासकीय धान खरेदीत 9.58 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत 494.50 लाख टन धानाची खरेदी झाली होती. खरीप विपणन हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) पर्यंत, सरकारने एकूण 775.72 लाख टन धान खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, गेल्या खरीप पणन हंगामात सरकारने एकूण 759.32 लाख टन तांदळाची खरेदी केली होती.


अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका


2022 मध्ये हवामानाची अनिश्चितता तसेच अतिवृष्टीमुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. खरीप हंगामाच्या सुरुवातीला बदलत्या हवामानामुळं अनेक भागात शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. पावसाळ्यात उशिरा आलेल्या भातच्या रोपवाटिका खराब झाल्या होत्या. तर काही ठिकाणी पाऊस कमी झाला होता. त्यामुळं उत्पादनात घट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. काही शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था करून भातशेती केली. मात्र उशिरा आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मेहनत उद्ध्वस्त केली. काही ठिकाणी भाताचे पीक वाया गेले. त्यामुळं शेतकरीही हतबल झाले होते. 


पंजाब आणि तेलंगणामध्ये तांदूळ खरेदीत थोडी घट


पंजाब, छत्तीसगड, हरियाणा आणि तेलंगणामध्ये या तांदळाचे उत्पादन करणाऱ्या राज्यामध्ये ऑक्टोबरपासून तांदळाची खरेदी सुरू झाली आहे. त्याचवेळी, केरळ आणि तामिळनाडू आणि दक्षिण भारतीय तांदूळ उत्पादक प्रमुख राज्यांमध्ये सप्टेंबरमध्येच तांदळाची खरेदी सुरू झाली. सरकारने दिलेल्या आकडेवारी खरीप हंगाम 2022-23 मध्ये, जवळजवळ सर्व राज्यांमध्ये तांदळाची खरेदी केली जात आहे. परंतु पंजाब आणि तेलंगणामध्ये कमी खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत पंजाबमध्ये 187.12 लाख टन धानाची खरेदी झाली होती, जी यावर्षी 182.13 लाख टन इतकी झाली आहे. तेलंगणातही केवळ 56.31 लाख टनतांदळाची खरेदी झाली आहे, तर गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत 63.84 लाख टन तांदळाची खरेदी झाली होती.


'या' राज्यात मोठ्या प्रमाणावर तांदूळ खरेदी 


छत्तीसगड राज्यानं मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी केली आहे. तिथे आत्तापर्यंत 82.89 लाख टन तांदळाची खरेदी झाली आहे. तर गेल्या वर्षी केवळ 55 लाख टन तांदळाची खरेदी झाली होती. हरियाणात गेल्या वर्षीच्या 54.50 लाख टनांच्या तुलनेत यंदा 58.96 लाख टन तांदळाची खरेदी झाली आहे. सध्या उत्तर प्रदेशातही, मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी सुरु आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Rice Export : तांदूळ निर्यातीवरील बंदी कायम, मात्र 'या' लोकांना मिळाली निर्यातीसाठी मंजूरी