Agriculture News : भारत सरकारने शेतकर्‍यांकडून किमान आधारभूत किंमतीनं (MSP) तांदूळ खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सरकारनं आत्तापर्यंत 12.21 लाख टन तांदळाची आधीच खरेदी केली आहे. अन्न मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, पंजाब आणि हरियाणामधील 99 हजार 675 शेतकऱ्यांकडून 2,689.77 कोटी रुपयांचा तांदूळ खरेदी करण्यात आला आहे. यंदा काहीशा मोठ्या क्षेत्रावर पेरणी झालेल्या खरीप भाताची काढणी गेल्या आठवड्यात सुरू झाली.


यावर्षी 411.96 लाख हेक्टरपेक्षा  अधिक क्षेत्रावर भाताची लागवड 


केंद्र सरकारकडून आधारभूत किंमतीने तांदळाची खरेदी सुरु केली आहे. अन्न मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) शेतकऱ्यांकडून सुमारे 12.21 लाख टन धान्य खरेदी करण्यात आले आहे. यावर्षी 411.96 लाख हेक्टरपेक्षा किंचित जास्त क्षेत्रावर पेरणी झालेल्या खरीप भाताची काढणी गेल्या आठवड्यात सुरू झाली.


चालू हंगामात 521.27 लाख टन तांदूळ खरेदी करण्याचे उद्दीष्ट


भारतीय अन्न महामंडळ (FCI) आणि राज्य संस्थांनी बफर स्टॉक तयार करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी MSP वर खरेदी केली आहे. मंत्रालयाने चालू हंगामात 521.27 लाख टन तांदूळ खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जे मागील वर्षीच्या हंगामात 496 लाख टन खरेदी केले होते.


कमी पावसामुळं उत्पादनात घट होण्याची शक्यता


तांदळाच्या लागवडीचा हंगाम संपला आहे. यंदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मात्र, उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. पश्चिम बंगाल हे तांदळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे. तसेच झारखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये एकरी उत्पादनात देखील घट झाली आहे. काही राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. 


तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध


केंद्र सरकारकडून तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार तांदळाच्या निर्यातीवर (Rise Export) घातलेले निर्बंध मागे घेण्याची शक्यात आहे. देशांतर्गत बाजारात तांदळाच्या वाढत्या किमती स्थिर झाल्यानंतर आणि पुरवठ्यात सुधारणा झाल्यानंतर सरकार तांदळाच्या निर्यातीवरील बंदी मागे घेण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर सरकार आपल्या साठ्यातील तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचाही विचार करत आहे. एका वृत्तानुसार, केंद्र सरकारकडे तांदळाचा पुरेसा साठा आहे.  त्यामुळे कल्याणकारी योजनांद्वारे तांदूळ पुरवण्यात सरकारला कोणतीही अडचण येणार नाही. संपूर्ण जगात भारताचा तांदूळ व्यापारातील वाटा सुमारे 40 टक्क्यांच्या घरात आहे. भारताने तांदळाच्या निर्यातीवर घातलेले निर्बंध मागे घेतल्यास जगभरातील तांदळाच्या किमती खाली येण्यास मदत होईल, असे म्हटले जात आहे.