Agriculture News : खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शेतकऱ्यांसाठी 22 हजार 300 कोटी रुपयांची गिफ्ट जाहीर केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमतींमध्ये वाढ होत असताना सरकारनं रब्बी हंगामासाठी P&K खतांवर 22,303 कोटी रुपयांच्या सबसिडीला मंजुरी दिली आहे. त्यामुळं युरियाच्या दरात कोणतीही वाढ होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी सरकारने रब्बी पिकांच्या एमएसपीमध्येही वाढ केली होती.


मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय 



  • खतांच्या किमतीवरील अनुदान कायम राहणार 

  • एनबीएस अंतर्गत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत खते मिळत राहतील.

  • युरियाच्या दरातही वाढ केली जाणार नाही.

  •  उत्तराखंडच्या जमराणी धरण बहुउद्देशीय प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजना-त्वरित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • अनुराग ठाकूर म्हणाले की, या कार्यक्रमात उत्तराखंडच्या जमरानी धरण बहुउद्देशीय प्रकल्पाचा समावेश करून उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील लोकांना फायदा होईल.

  • रब्बी हंगामासाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दिले जाणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. सन 2021 पासूनच, शेतकऱ्यांवर अतिरिक्त बोजा पडू नये अशा पद्धतीने अनुदान दराचे व्यवस्थापन केले जात आहे.


युरियावर सबसिडी कशी देणार?


माहिती देताना अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, रब्बी हंगामासाठी अनुदान 1 ऑक्टोबर 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहील. नायट्रोजनवर प्रतिकिलो 47.2 रुपये अनुदान असेल. फॉस्फरसला प्रतिकिलो 20.82 रुपये अनुदान मिळणार आहे. पोटॅशवर अनुदान 2.38 रुपये प्रति किलो असेल. सल्फरवर 1.89 रुपये प्रति किलो अनुदान असेल.


रशियाच्या निर्णयामुळं खतांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. जागतिक खत  पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यानं रशियानं (Russia) भारताला (India) डायअमोनियम फॉस्फेटसारखी (डीएपी) खते (Fertiliser) सवलतीच्या दरात देणं बंद केलं आहे. याबाबतचे वृत्त इकोनॉमिक टाइम्सने दिले होते. त्यामुळं खते महागण्याची शक्यता वर्तवली होती. याचा भार शेतकऱ्यांवर (Farmers) पडणार असून त्यांचा खर्च वाढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, सध्या रब्बी हंगामात खतांच्या किंमती वाढणार नसल्याचे सरकारनं जाहीर केलं आहे. गेल्या वर्षी रशिया हा भारताला सर्वात मोठा खतांचा पुरवठा करणारा देश बनला होता. हा पुरवठा सवलतीच्या दरात केला जात होता. मात्र, आता बाजारपेठेतील किमतीप्रमाणे खतांचा पुरवठा करण्याची भूमिका रशियाच्या कंपन्यांनी घेतली आहे. त्यामुळं भारतात खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता होती.


महत्त्वाच्या बातम्या:


Fertiliser : खते महागणार? बळीराजाचा खर्च वाढणार; रशियाकडून सवलतीच्या दरात खत देणं बंद