Agriculture News : कवडीमोल भावामुळे टोमॅटो (Tomato) तोडणी बंद केल्यामुळे लातूर (Latur) जिल्ह्याच्या वडवळ परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. टोमॅटो प्रक्रिया उद्योगाची गरज आहे, भाव नसल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच बाजारात उठाव नसल्यामुळे टोमॅटोच्या बाजारभावावर परिणाम झाला आहे. टोमॅटोची तोडणी बंद केल्यामुळे शेतशिवार लालेलाल झालं आहे.


टोमॅटोची लागवड जास्त पण दर घसरले


लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ हे गाव टोमॅटोचे  गाव म्हणून प्रसिद्ध आहे. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गाव टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी जास्तीत जास्त भाजीपाल्याकडे वळलेला आहे. टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन वडवळ शिवारात होत असल्यामुळे बाहेरील व्यापारी थेट बांधावर येऊन टोमॅटोची खरेदी करतात. म्हणून शेतकऱ्यांना टोमॅटोचा अधिक फायदा होतो. यंदाही मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड झालेली आहे. मात्र, भाव घसरल्याने कवडीमोल उत्पन्न हाती येत आहे. परिणाम शेतकऱ्यांनी तोडणी बंद केली आहे. त्यामुळे शेतशिवार टोमॅटोमुळे लालेलाल झाल्याचे दिसत आहे. 


शेतकऱ्यांकडून टोमॅटोची तोडणं बंद 


वडवळसह परिसरातील ब्रह्मवाडी, शिवापूर तांडा, शंकरनगर तांडा, खुर्दळी, मोहनाळ, कडमुळी, घरणी, घारोळा, दापक्याळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून टोमॅटोची लागवड केली आहे. लाखो रुपयांचे कीटकनाशक आणून टोमॅटोवर रोगराई होऊ नये म्हणून काळजी घेऊन फवारणी करण्यात आली. येवढा खर्चा करुनही सध्या टोमॅटो कवडीमोल किंमतीने जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील टोमॅटो तोडणे बंद केले आहे. 


एकीकडे मजुरांची मजुरी वाढली असून शेतकऱ्याला मजुरी देऊनही टोमॅटो विक्रीतून शिल्लक काही राहत नसल्याने अक्षरशः शेतकऱ्यांनी शेतातच टोमॅटोचे मोठ-मोठे फड तसेच सोडून दिल्याने पूर्ण शेतशिवार लालेलाल होऊन टोमॅटो जाग्यावर गळत आहेत.


अवघ्या 40 पैसे किलोचा भाव मिळाल्याने औरंगाबादमधील शेतकऱ्याने टोमॅटो रस्त्यावर फेकले


टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने  रस्त्यावर फेकण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) वडजी गावातील एका तरुण शेतकऱ्याने टोमॅटोला बाजारात भाव न मिळाल्याने ते अक्षरशः रस्त्यावर फेकून दिले आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील वडजी गावातील कैलास बोंबले यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला बाजारात 30 ते 50 रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच 40 पैसे किलो असा भाव टोमॅटोला मिळत असल्याचं कळताच त्यांनी अर्ध्या रस्त्यातच टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. 


संबंधित बातमी