Wheat Export : सध्या देशातून गव्हाची मोठ्या प्रमाणात निर्यात (Wheat Export) केली जात आहे. गेल्या सात महिन्यांच्या काळात देशातून 46 लाख टन गव्हाची निर्यात झाल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. तर दुसरीकडे तांदळाच्या निर्यातीत (Rice Export) देखील वाढ झाली आहे. केंद्र सरकारनं (Central Government) गहू आणि तादळाच्या निर्यातीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे.


गहू हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. यंदा देशात गव्हाची मोठ्या प्रमाणावर पेरणी होत आहे. एक-दोन राज्ये सोडली तर सर्वच राज्यांमध्ये गव्हाचा पेरा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. भारत अन्नधान्याच्या बाबतीत देशांतर्गत गरज पूर्ण करत आहे. तसेच इसर देशातही मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहे. गव्हाच्या आणि तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.


गव्हाची 46 लाख टन तर बासमती तांदळाची 24 लाख टन निर्यात


केंद्र सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 46.56 लाख टन गव्हाची निर्यात झाली होती. त्याची किंमत 1.5 अब्ज डॉलर्स आहे. तर 2021-22 मध्ये 2.12 अब्ज किंमतीचा गहू निर्यात झाला होता. तर दुसरकीडे 2022-23 च्या पहिल्या सात महिन्यांत 24.10 लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. त्याची किंमत 2.54 अब्ज डॉलर्स असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.


186 निर्यातदारांना गहू निर्यातीची परवानगी 


या वर्षाच्या सुरुवातीपासूनच गव्हाच्या दरात वाढ झाली होती. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम देशातील गव्हाच्या किंमतीवरही झाला होता. गव्हाच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. सध्या देशात गव्हाच्या साठवणुकीची स्थिती ठीक आहे. त्यामुळं निर्यातदार अनेक दिवसांपासून गव्हाच्या निर्यातीत सूट देण्याची विनंती केंद्र सरकारकडं करत होते. देशातील अन्नसुरक्षेची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारनं गव्हाची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार 186 निर्यातदारांना काही अटींनुसार गहू निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


देशात गव्हाच्या लागवडीत वाढ 


सध्या गव्हाच्या पेरणीसाठी हवामान अनुकूल आहे. अधिक पावसामुळं जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढले आहे. देशात गव्हाची पेरणी करण्यास पोषक वातावरण आहे. त्यामुळं शेतकरी अधिक क्षेत्रावर गव्हाची पेरणी करत आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार या रब्बी हंगामात गेल्या आठवड्यापर्यंत गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्र तीन टक्क्यांनी वाढून 286.5 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. यंदा मात्र, गव्हाच्या लागवडीत वाढ झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Crop Cultivation : यंदा देशात गव्हाच्या लागवडीत वाढ, मात्र 'या' राज्यांमध्ये घट; वाचा सविस्तर....