11 February Headlines : पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील चित्र आता स्पष्ट झाले असून प्रचाराला आता जोर लागणार आहे. तर, दुसरीकडे  नाशिकमध्ये भाजपची प्रदेश कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपचे निम्म्याहून अधिक मंत्री या बैठकीत सहभागी असणार आहेत. जाणून घेऊयात, आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी... 


नागपूर 


- माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख कारागृहातून बाहेर आल्यानंतर सव्वा वर्षानंतर पहिल्यांदाच नागपूरात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली असून नागपूर विमानतळावरून मोठी बाईक रॅली काढण्यात येणार आहे.


नाशिक 


- भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह निम्याहून अधिक मंत्रिमंडळाची उपस्थिती असणार आहे.


रत्नागिरी


-  रिफायनरी विरोधकांचा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे.  दिवंगत पत्रकार वारिसे यांच्या समर्थनात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.


पुणे 


-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात विविध बैठकांना, कार्यक्रमांना मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. 


- महाविकास आघाडीचे कसबा पेठचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात असणार आहेत.


- केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्या प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे.


औरंगाबाद 


- विरोधी पक्ष नेते अजित पवार औरंगाबादच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्या दरम्यान, अजित पवार शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.


कोल्हापूर 


- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विद्यापीठांमध्ये विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिवाजी विद्यापीठासमोर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.


नवी मुंबई 


- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नवी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. देवस्थ मराठा भवनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात भाजपचे आमदार गणेश नाईक आणि  इतर सर्वपक्षीय नेतेदेखील हजर राहणार आहेत. 


सोलापूर 


- उद्योग मंत्री उदय सामंत हे आज सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. उद्योग विभागाचा आढावा घेणारी बैठक होणार आहे. त्याशिवाय, औद्योगिक संघटनांसोबत चर्चा करणार आहेत. 


वाशिम 


- आज पोहरादेवी इथे सेवाध्वज कार्यक्रमानिमित्त तीन राज्यातून पोहरादेवी इथं सेवाध्वज दाखल होणार आहेत. यावेळी मंत्री संजय राठोड उपस्थित असणार आहेत.