Agriculture News : एकीकडे राज्यात तापमानात वाढ होत असताना नागरिकांना दिलासा मिळत आहे मात्र दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) अजूनही थंडीचा कडाका (Cold Wave) कायम असून धुळे (Dhule) जिल्ह्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आत असल्याने वातावरणातील गारठा कमी झालेला नाही. यातच जिल्ह्यात धुक्याची चादर अजूनही कायम असल्याने याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


कांदा पीकही रोगाच्या विळख्यात


नाशिकमध्ये कांदा पिकावर करपा तसंच मावा कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. कांदा पिकाला थंडी पोषक असते. परंतु सततच्या ढगाळ आणि बदलत्या वातावरणामुळे माव्याचे कीटक कांदा पातीतील पोषणतत्त्वे शोषून घेतात. त्यामुळे कांद्याची वाढ होत नाही. दरम्यान "ढगाळ वातावरण आणि पहाटे पडणारे धुके यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तरी शेतकऱ्यांनी बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची नियमितपणे फवारणी करणे आवश्यक आहे," असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.


केळी पिकाची काळजी घेण्याचं कृषी विभागाचं आवाहन


तापमान खालावल्याने त्याचा फटका नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या केळी बागांची काळजी घ्यावी असे आहवान कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केले गेली आहे. 


राज्याच्या इतरही भागात वातावरण बदलाचा पिकांना फटका


अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या संकटातून बाहेर पडत आता शेतकरी रब्बीच्या पिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र असं असतानाच वातावरणातील बदलाचा फटका रब्बीच्या पिकांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात यावर्षी मोठ्याप्रमाणात लागवड झालेल्या हरभरा पिकावर सध्या बदलत्या वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे घाटे अळीच्या नुकसानीची पातळी ओळखून शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने हरभऱ्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.


धुळ्यातील हवेची गुणवत्ताही बिघडली


वातावरणातील गारठा आणि धुके यामुळे हवेची गुणवत्ता देखील खराब झाली असून धुळ्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 174 इतका नोंदवला गेला आहे. पुढील काही दिवस तापमान 10 अंश सेल्सिअस आत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


हेही वाचा


Agriculture News : बदलत्या हवामानाचा आंब्यासह काजू पिकाला फटका, फक्त 25 टक्केच फळधारणा; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान