Agriculture News : सध्या राज्यात हवामानामध्ये सातत्यानं बदल होत आहेत. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. कोकणात बदलत्या हवामानाचा (Climate Change) फटका आंबा आणि काजू पिकांना बसला आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात आंबा (Mango) आणि काजू (Cashew) पिकांना फक्त 25 टक्केच फळधारणा झाली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
मशागतीसाठी झालेला खर्चही निघणं अवघड
बदलत्या हवामानामुळे कोकणातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण बदलत्या हावामानाचा पिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. तर काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं चित्र दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, यावर्षी बदल्या हवामानामुळ केवळ 25 टक्केच फळधारणा झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या आणि काजूच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यावर्षी फवारणीसह मशागतीच्या कामासाठी झालेला खर्चही बागायतदारांच्या उत्पादनातून मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका बाजूला उत्पादनात होणार घट आणि खर्च वाढत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारं बँकांचं कर्जही वाढत आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे बँकांचं कर्ज फेडणं शेतकऱ्यांना अडचणीचं ठरणार आहे.
राज्याच्या इतरही भागात वातावरण बदलाचा पिकांना फटका
अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या संकटातून बाहेर पडत आता शेतकरी रब्बीच्या पिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र असे असतानाच वातावरणातील बदलाचा फटका रब्बीच्या पिकांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात यावर्षी मोठ्याप्रमाणात लागवड झालेल्या हरभरा पिकावर सध्या बदलत्या वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे घाटे अळीच्या नुकसानीची पातळी ओळखून शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने हरभऱ्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रात केळी पिकावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता
उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. याचा फटका नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या केळी बागांची काळजी घ्यावी असे आहवान कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केले गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: