Agriculture News : पौष्टिक तृणधान्यांचा वापर आपल्या घरापासून सुरु करावा असे आवाहन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी (Minister Kailash Choudhary) यांनी केले. पुण्यात (Pune) आयोजित केलेल्या 'नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये' या विषयावर आयोजित कार्यशाळेत चौधरी बोलत होते. नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये या दोन्ही बाबी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या संदर्भात कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका पुढील काळात निर्णायक असल्याचे चौधरी म्हणाले.
कृषी विज्ञान केंद्रांना स्वतंत्र पुरस्कार देण्याची घोषणा
नैसर्गिक शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांना स्वतंत्र पुरस्कार देण्याची घोषणाही मंत्री कैलाश चौधरी यांनी केली. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा. तर प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राने आपल्या प्रक्षेत्रावर किमान 25 टक्के क्षेत्रावर नैसर्गिक शेती करण्याचे आवाहनही कैलाश चौधरी यांनी केलं. तसेच पौष्टिक तृणधान्यांचा वापर प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरु करावा असे आवाहन देखील त्यांनी केलं. यावेळी डॉ. पी. जी. पाटील (कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी), डॉ. व्ही. पी. चहल, सहाय्यक महानिदेशक (कृषी विस्तार), भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली; डॉ. सी. के. तिंबाडीया (कुलगुरु, गुजरात नैसर्गिक आणि सेंद्रिय कृषी विद्यापीठ आनंद, गुजरात) विजयअण्णा बोराडे, (अध्यक्ष, मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, जालना) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
राहुरी कृषी विद्यापीठाकडून ज्वारी आणि बाजरीचे चांगले वाण विकसित
पौष्टिक तृणधान्याच्या प्रचार प्रसारासाठी यांत्रिकीकरणावर भर देण्याचे आवाहन मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे अध्यक्ष विजयअण्णा बोराडे यांनी केलं. बदलत्या परिस्थितीनुसार कृषी विज्ञान केंद्रातील मनुष्यबळ वाढवण्याच्या आणि कृषी विज्ञान केंद्रांना अधिक बळकट करण्याची सूचना त्यांनी केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्वारी, बाजरी या पिकात अनेक चांगले वाण विकसित केले असून त्यांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असल्याची माहिती राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.
300 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुखांसह कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, अशासकीय संस्थांचे अध्यक्ष, भारतीय कृषी अनुसंधान परिषद संलग्न संस्थांचे संचालक, सर्व विद्यापीठांचे विस्तार शिक्षण संचालक, राज्य शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख यांच्यासह 300 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या: