Soybean Disease : सध्या विदर्भात (Vidarbha) सोयाबीन (soybeans) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. विदर्भातील सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं विदर्भातील सुमारे 60 ते 70 टक्के पीक वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. संपूर्ण अहवाल हाती आल्यानंतर सरकारकडून काय नुकसान भरपाई देता येईल याचा निर्णय होईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विदर्भातील सोयाबीन पिकांची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते.  


ठोस उपाययोजना करणं गरजेचं


सोयाबीनवरील यलो मोझॅक रोगामुळं विदर्भात सुमारे 60 ते 70 टक्के पीक वाया जाण्याची स्थिती असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य केले आहे. अतिवृष्टी आणि येलो मोझॅक रोगामुळं विदर्भात होत असलेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज राधाकृष्ण विखे पाटील नागपूर जिल्ह्यातील काही शेतांची पाहणी केली. त्या ठिकाणी सोयाबीनचे सुकलेले पीक पाहून त्यांनी 60 ते 70 टक्के पीक वाया गेल्याचे मान्य केले आहे. येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दरवर्षी वाढत चालला असून त्यासंदर्भात कृषी शास्त्रज्ञ, विद्यापीठ आणि शासन मिळून ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे विखे पाटील म्हणाले.


शेतकऱ्यांना पीक विम्यातून मोठी मदत मिळेल


दरम्यान, यावर्षी सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा हप्ता भरला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना पीक विम्यातून मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. सरकारनं केलेल्या कराराप्रमाणं लवकरच पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईचा अग्रीम हप्ता शेतकऱ्यांच्या हाती पडेल असे विखे पाटील म्हणाले. शिवाय येलो मोझॅक रोगासंदर्भात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण अहवाल हाती आल्यानंतर सरकारकडून काय नुकसान भरपाई देता येईल याचा निर्णय होईल अशी माहिती महसूलमंत्री विखे पाटील यांनी दिली.


यलो  मोझॅक रोगाची लक्षणं 


झाडांची पाने आकाराने लहान होतात. पानांचा काही भाग हिरवट तर काही पिवळसर दिसून येतो.
पानांच्या शिराजवळ पिवळ्या रंगांचे डाग दिसतात.
प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते.
पाने सुरकत्या पडून ती ओबडधोबड होतात.
लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास, संपूर्ण झाड पिवळे पडतात. 
झाडांना फुले आणि शेंगा कमी लागतात. 
शेंगामध्ये दाणे भरत नाहीत किंवा आकाराने लहान दाणे भरतात. 
उत्पादनात मोठी घट होते.


महत्त्वाच्या बातम्या:


सध्या विदर्भात (Vidarbha) सोयाबीन (soybeans) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. विदर्भातील सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.