Agriculture News : देशभरात राबवण्यात आलेल्या एक देश-एक शिधापत्रिका (Ek Desh Ek Ration Card) या महत्वाकांक्षी योजनेमुळं गरीबांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी केलं. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या (PM Garib Kalyan Anna Yojana) माध्यमातून केंद्र सरकारनं गरीबांना 3.90 लाख कोटी रुपयांचे मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिल्याच तोमर म्हणाले. सरकारनं 2021-22 मध्ये शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत भावाने (MSP) 2.75 लाख कोटी रुपयांच्या शेतमालाची  विक्रमी खरेदी केली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे तोमर म्हणाले.


मोफत अन्नधान्याच्या वाटपासाठी 3.90 लाख कोटींचा खर्च 


कोरोनाच्या महामारीमुळं निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळं गरिबांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरु करण्यात आली. अन्न सुरक्षेवरील त्याचा परिणाम कमी करण्यासाठी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA), अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब (PHH) योजनेच्या 80 कोटी लाभार्थ्यांना,  पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने (PM-GKAY) अंतर्गत दरमहा 5 किलो प्रति व्यक्ती या प्रमाणात मोफत अन्नधान्य वाटप केले. या अंतर्गत, आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 1118 लाख मेट्रीक टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी 3.90 लाख कोटी रुपयांहून जास्त खर्च करण्यात आले. एक देश-एक शिधापत्रिका, पोषण-मूल्य वर्धित तांदूळ वितरण, लक्ष्यित सार्वजनिक वितरण आणि केंद्रसरकारच्या इतर योजनांसह विविध योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याची माहिती कृषीमंत्री तोमर यांनी दिली. 99.5 टक्क्यांहून अधिक शिधापत्रिका आधार कार्डशी जोडल्या गेल्या असल्याचेही तोमर म्हणाले.


साखर उद्योगाचे वार्षिक उत्पादन सुमारे 1 लाख 40 हजार  कोटी रुपये


तांदळाचे पोषण मूल्य आणि त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट 2021) सर्व सरकारी योजनां अंतर्गत पोषण-मूल्य वर्धित तांदळाचा पुरवठा करून पोषणाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्याची घोषणा केली होती. भारतीय साखर उद्योग हा एक महत्त्वाचा कृषी आधारित उद्योग आहे. यामध्ये 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आहेत. आज भारतीय साखर उद्योगाचे वार्षिक उत्पादन सुमारे 1 लाख 40 हजार  कोटी रुपये असल्याची माहिती तोमर यांनी दिली. व्यापार सुलभता क्रमवारीत भारताने लक्षणीय झेप घेतल्याची माहितीही यावेळी तोमर यांनी दिली. जगातील 190 देशांमध्ये, भारताने 2013 मधील 134 व्या स्थानावरून 63 व्या स्थानावर झेप घेतली आहे, म्हणजेच 2013 च्या तुलनेत 71 क्रमांकानी भारताचे स्थान उंचावले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Farm Law : MSP च्या आश्वासनाचं काय झालं? काँग्रेसचा कृषीमंत्र्यांना सवाल, तोमर म्हणाले....