Puntamba Farmer Protest : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन 1 जूनपासून अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा याठिकाणी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसात शेतकऱ्यांनी शिल्लक ऊसाची होळी, मोफत दूध आणि फळवाटप करुन सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या शेतकरी आंदोलानाची दखल कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली आहे. दादाजी भुसे हे आज आंदोलकांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
विविध प्रश्नांवरुन पुणतांबा येथील शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं कृषीमंत्री दादा भुसे हे आंदोलकांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. त्यामुळं आता यातून काही तोडगा निघणार का? की कृषीमंत्री सर्व मागण्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाला चर्चेच आमंत्रण देतात हे पाहणे महत्वाच ठरणार आहे. मात्र, कृषीमंत्री काही ठोस आश्वासन देणार का? आणि आंदोलक हे आंदोलन मागे घेणार का? गे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
पुणतांबा गावातील आंदोलक शेतकऱ्यांना पहिल्याचं दिवशी 149 अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. कोरोनाचं समूळ उच्चाटन न झाल्याचं कारण देत ही नोटीस बजावली. राज्यात सगळीकडे सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय मेळावे, मोर्चा, सभा सुसाट सुरु असताना ही नोटीस दिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन:
1) ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे
2) शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे
3) कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा
4) कांद्याला प्रती क्विंटल 500 रूपये अनुदान द्यावे
5) शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण आणि सुरळीतपणे वीज मिळावी
6) थकित विजबिल माफ झाले पाहिजे
7) कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी
8)सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा
9) 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी
10) नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे
11) दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा
12) दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा
13) खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी
14) वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी
15) शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे
16) वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर केल्या जाव्या