Agriculture Growth In India : सध्या देशात अन्नधान्याचा (Food) पुरेसा साठा उपलब्ध आहे. अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गहू (Wheat), तांदूळ (Rice), मका, भरड धान्याचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. तसेच दूध उत्पादनात (Milk Production) भारताचा पहिला क्रमांक असल्याचे केंद्र सरकारनं सांगतिलं आहे. अशातच देशातून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात (Export of Food) देखील वाढली आहे. केंद्र सरकारनं निर्यातीच्या संदर्भातील माहिती दिली आहे.
कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थाच्या निर्यातीत 13 टक्क्यांची वाढ
भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी देखील अन्नधान्याचे देशावर कोणतेही संकट नसल्याचं सरकारनं सांगितलं आहे. पशुसंवर्धनातही भारत अग्रगण्य देशांपैकी एक आहे. आता भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांची आकडेवारी समोर आली आहे. वाणिज्य मंत्रालयाने कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न निर्यातीची आकडेवारी जाहीर केली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही निर्यात 19.69 अब्ज डॉलर झाली आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते. APEDA ने 2022-23 साठी कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नासाठी 23.6 अब्ज डॉलरचे उद्दिष्ट ठेवलं आहे.
गहू आणि तांदळाच्या निर्यातीतही मोठी वाढ
केंद्र सरकारकडून गहू आणि तांदळाच्या निर्यातीची आकडेवारीही जाहीर करण्यात आली आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत बासमती तांदळाची निर्यात 40.26 टक्क्यांनी वाढून 3.33 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्याचवेळी बिगर बासमती तांदळाची निर्यातही 3.35 टक्क्यांनी वाढून 4.66 अब्ज डॉलर झाली आहे. गव्हाच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत एप्रिल-डिसेंबर 2021 मधील 145.2 दशलक्षवरून गव्हाची निर्यात 4 टक्क्यांनी वाढून एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये 150.8 दशलक्ष डॉलर झाली आहे. त्याचवेळी, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीत घट झाली आहे.
9 फेब्रुवारीपर्यंत देशातून 27.83 लाख टन साखरेच्या निर्यातीत वाढ
साखर उत्पादनाच्या बाबतीतही भारत जगातील मोठा देश आहे. भारतातून अनेक देशांना साखरेची निर्यात केली जाते. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या आकडेवारीनसार चालू विपणन वर्ष 2022-23 मध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत देशातून 27.83 लाख टन साखर निर्यात झाली आहे. भारत बांगलादेश आणि इंडोनेशियाला सर्वाधिक साखरेची निर्यात करतो. याशिवाय जिबूती, सोमालिया, संयुक्त अरब अमिराती येथे साखर निर्यात केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या: