सांगली : आताच्या राजकीय कार्यकर्त्यांकडे पाहिले की 'नेत्यासाठी काय पण'; या म्हणीचा आपल्याला वेळोवेळी प्रत्यय येतो. अशाच एका कार्यकर्त्यांने आपल्या नेत्यासाठी काय पण असे म्हणत त्याला विधानपरिषद सदस्यासाठी संधी मिळावी म्हणून पक्षातील वरिष्ठ नेत्यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे. इस्लामपूरचे नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या निशिकांत पाटील यांच्यासाठी आष्टा येथील प्रवीण माने या कार्यकर्त्याने हे पत्र लिहिले आहे. प्रवीण हे भाजपचे कार्यकर्ते आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष असून त्यानी निशिकांत पाटील यांना विधानपरिषद सदस्यासाठी संधी मिळावी, अशा आशयाचे पत्र  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आपल्या रक्ताने लिहून पाठवले आहे.




भारतीय जनता पार्टीचा विचार, मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदीसाहेब आणि आपल्या नेतृत्वाखाली झालेला विकास व भविष्यातील देश हिताचे धोरण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातील प्रत्येक घटकांपर्यत पोहोचवण्यासाठी निशिकांतदादा पाटील यांच्यासह भाजपाचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. आपला शब्द प्रमाण म्हणून निशिकांतदादा पाटील यांची वाटचाल सुरु आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वातून एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. इस्लामपूर विधानसभा निवडणूकही त्यांनी लढवली आहे. राजकीय तसेच सामाजिक कार्य करीत असताना विरोधी गटाकडून त्यांना अडचणीत आणण्याचे अनेक प्रकार घडत आहेत, तरीही दादा डगमगले नाहीत. भाजपचा प्रचार आणि प्रसार त्यांनी सुरुच ठेवला आहे. अशा कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वाला विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळाली तर खऱ्या अर्थाने या मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्याचा सन्मान होईल. सध्या सुरु असलेला राजकीय संस्थांत्मक व कार्यकर्त्याचा संघर्ष या निवडीमुळे संपून जाईल आणि भविष्यात या मतदारसंघातून विधानसभेमध्ये भाजपाचा आमदार पोहोचवण्यासाठी बळ मिळेल. तरी कृपया आपण आमच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. आपला आशीर्वाद दादांसह माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर आहे, तो यापुढेही राहिल. तरी आपणांस पुनश्च विनंती निशिकांतदादा पाटील यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी ही नम्र विनंती या पत्राद्वारे प्रवीण माने या कार्यकर्त्यांने केली आहे.


यापूर्वी प्रियकराने प्रेयसीसाठी किंवा सिनेकलाकारांना त्यांच्या चाहत्यांनी रक्ताने पत्र लिहिल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. पण एका राजकीय कार्यकर्त्याने आपल्या नेत्याला विधानपरिषद उमेदवारी मिळावी यासाठी रक्ताने पत्र लिहून आपली निष्ठा, प्रेम व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे.