Panjabrao Dakh on Monsoon : 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी व्यक्त केला आहे. तर 22 जूनपर्यंत संपूर्ण देशात पाऊस पडेल असेही डख यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे, कारण मान्सून पूर्वेकडून येत आहे. ज्यावेळी मान्सून पूर्वेकडून येतो त्यावेळी पाऊस जास्त पडतो. यावर्षी देखील मान्सून पूर्वेकडूनच आला असून, पावसाचे प्रमाण जास्त असल्याचं डख यांनी सांगितलं. माढा तालुक्यातील मानेगाव इथे सुभेदार गणेश लांडगे यांच्या सैन्य सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात डख बोलत होते. 




शेतकरी सर्व काही करतो. शेतात कष्ट करुन जोमानं पीक आणतात मात्र, निसर्गाचा फटका बसला की पिकांचं मोठं नुकसान होतं. निसर्ग शेतकऱ्याच्या हातात नसल्यानं शेतकऱ्यांना फटका बसतो. मात्र, शेतकऱ्यांनी आता घाबरायची गरज नाही. पावसाचा अंदाज समजून घेतला तर नियोजन करता येईल असेही डख यावेळी म्हणाले.  6 जूनला मान्सून मुंबईत तर 7 जूनला बहुतांश महाराष्ट्रात पाऊस बरसेल. तर 15 जूनपर्यंत  संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचं डख यांनी सांगितलं.


जितकी झाड जास्त तिकडे पाऊस रिमझिम


जितकी झाड जास्त तिकडे पाऊस रिमझिम पडतो. ज्या ठिकाणी झाडांचे प्रमाण कमी आहे, त्याठिकाणी पाऊस रिमझीम होत नाही. रिमझीम पाऊस चागला असतो.  त्यामुळं झाड लावणं काळाची गरज असल्याचे डख म्हणाले. पुण्याकडे पाऊस हा रिमझीम पडतो. कारण त्याठिकाणी झाडांचे प्रमाण जास्त असल्याचे डख यांनी सांगितले. झाडे कमी असतील की तापमानात वाढ, वादळे, तर काही ठिकाणी गारपीट होते असेही डख यांनी सांगितलं.




पाऊस येतो हे ओळखायचे कस



  • दिवस मावळताना सूर्याभोवती आभाळ तांबड्या कलरचे दिसलं की तीन  दिवसानंतर पाऊस येतो

  • लाईटवर किडे, पाकुळे आले की पुढच्या तीन दिवसात पाऊस पडतो

  • मृग नक्षत्र 7 जूनला सुरु होते. यावेळी उभं वार सुटते. अशा वेळी जर झाडवरील चिमण्या धुळीत अंघोळ करत असतील तर पुढच्या तीन दिवसांनी पाऊस येतो

  • आकाशातून विमान जात असताना त्याचा आवाज आला की पुढच्या 3 दिवसात पाऊस येतो. कारण पाण्याचे ढग वर असतात.

  • गावरान आंबा जर मोठ्या प्रमाणात पिकला नाही तर पाऊस पडतो

  • जून महिन्यात सूर्यावर जर तपकिरी कलर आला की पुढच्या 4 दिवसांनी पाऊस येतो.

  • ज्या वर्षी चिंचेला चिंचा जास्त लागतात त्यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते. 

  • सरडांनी जर आपल्या डोक्यावर लाल कलर केला की पुढट्या चार दिवसांनी पाऊस पडतो. 

  • घोरपडी बिळाच्या बाहेर तोंड काढून बसत असतील तर पुढच्या चार दिवसात पाऊस पडतो.




अशा प्रकारे पाऊस कधी येणार हे ओळखण्याची माहिती पंजाबराव डख यांनी सांगितली. या सर्व गोष्टीचे जर तुम्ही निरक्षण केले तर तुम्हाला लगेच पावसाचा अंदाज येईल आणि होणार नुकसान टाळता येईल असे डख यांनी सांगितलं. सध्या निसर्ग बदलत आहे, त्यामुळं शेतऱ्यांनी देखील बदलायला हवं आणि पावसापासून आपलं होणार नुकसान टाळावं असे डख यावेळी म्हणाले.