Shivrajyabhishek Din 2022 : आज शिवराज्याभिषेक दिन. या निमित्तानं आज दुर्गराज रायगड दुमदुमणार आहे. यंदा शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला शिवभक्तांना हजेरी लावता आली नव्हती. यंदा मात्र राज्यात अद्यापतरी कोरोना निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा रायगड पुन्हा दुमदुमणार असून रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच, शिवस्वराज्यभिषेक दिन. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा. अशा या दिनाचं महत्व आणखी दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागानं 1 जानेवारी 2021 रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला. या अनुषंगानं यापुढे दरवर्षी 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी असंख्य शिवप्रेमी रायगडावर जातात आणि तिथे शिवराज्याभिषेक साजरा करतात.


कोरोना प्रादुर्भावानंतर यंदा मात्र शिवराज्याभिषेक सोहळा निर्बंधमुक्त होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर 5 आणि 6 जून 2022 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे. यंदा 'धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची', 'जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा' आणि 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा' हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असणार आहेत. देशभरातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावं, असं आवाहन समितीतर्फे करण्यात आलं आहे.


दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील अवघ्या मराठी माणसासाठी एक आनंदाचा उत्सवच आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो शिवभक्त हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी रायगडवर येतात. पण गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे हे शक्य झालं नाही. त्यामुळे यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त शिवभक्त येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.