आपण सोशल मीडियावर इतरांशी संवाद साधतो. यावेळी आपण आपल्या मनातील किंवा चेहऱ्यावरील हावभाव उत्तमरित्या दाखवण्यासाठी इमोजीचा वापर करतो. कधी-कधी आपल्या भावना सांगणं किंवा एखाद्याला समजावणं कठीण होत, अशा वेळी इमोजी आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. इमोजी आपल्या चेहऱ्यावरील आणि मनातील भाव योग्यरितीने समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायला मदत करतात. संवाद साधताना इमोजी आपल्याला भाषेची बंधन तोडण्यात मदत करतात. इमोजीचा शोध जपानमध्ये लागल्याचं सांगितलं जातं. इमोजी पहिल्यांदा जपानमध्ये 90 च्या दशकात वापरले जायचे. 2010 नंतर,इमोजींचा वापर वाढू लागला आणि आता हे इमोजी वेबसाइट्स आणि अॅप्समध्ये वापरले जातात. इमोजीपीडियाचे संस्थापक जेरेमी बर्गे यांनी 2014 मध्ये 'इमोजी डे' साजरा करण्यास सुरुवात केली होती.