विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध मोहालीमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे.



कोहलीने सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या उपाहारानंतर विश्वा फर्नांडोच्या चेंडूवर आठ हजारावी धाव पूर्ण केली.



कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा भारताचा सहावा खेळाडू आहे. कोहलीने आपल्या 100व्या कसोटीच्या 169व्या डावात 8000 धावा पूर्ण केल्या.



याशिवाय 100 व्या कसोटीत आठ हजार धावांना गवसणी घालणारा विराट हा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगनंतरचा दुसराच खेळाडू आहे.



दरम्यान शंभरावी कसोटी खेळणाऱ्या विराटला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.



केवळ 45 धावा करुन तो बाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या 8007 धावा झाल्या आहेत.



भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर प्रथम स्थानावर आहे.



सचिन तेंडुलकर (15921), राहुल द्रविड (13265), सुनील गावस्कर (10122), व्हीव्हीएस लक्ष्मण (8781) आणि वीरेंद्र सेहवाग (8503) हे भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत.