बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.

अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आज अहमदनगरहून कड्यापर्यंत रेल्वे इंजिनने ट्रॅकची चाचणी केली.

पटरीवरून रेल्वे इंजिन धावतानाचे चित्र पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.

आज दुपारच्या सुमारास झुकझुक आगगाडीचे इंजिन अहमदनगरवरून आष्टीच्या दिशेड मार्गस्थ झाले.

त्यानंतर अडीच वाजण्याच्या सुमारास या रेल्वे इंजिनचे आष्टी तालुक्यामध्ये आगमन झाले.

सदरील रेल्वे इंजिन हे ट्रॅकची चाचणी करत असून येत्या काही दिवसात लवकरच हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात येणार आहे.

त्यामुळे बीड जिल्हावासियांना गेल्या अनेक वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न होते ते अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.

कडा स्थानकात रेल्वेचे इंजिन येताच अनेक बघ्यांनी इंजिन पाहण्यासाठी गर्दी केली होती.