देशभरातील सर्व स्तरातील लोकांमध्ये राम मंदिराविषयी प्रचंड उत्साह आहे. अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. अयोध्या राम मंदिरासाठी धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील बिपीन कासार व गावातील काही कारागिरांनी 200 तांब्याचे कलश आतापर्यंत बनवले आहेत. श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होताना भारतातच नव्हे जगभरातील रामभक्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहेत. विशेष बाब म्हणजे अयोध्येत तब्बल 7 हजार किलो शिरा (हलवा) शेफ विष्णू मनोहर तयार करणार आहे. प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास शिरा अयोध्येत येणाऱ्या दीड लाख राम भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. इंग्लंडची राजधानी लंडनच्या राम भक्तांनी तिथल्या मंदिरांमध्ये राम शिरा प्रसाद म्हणून वाटण्याचे ठरविले आहे. अवघा देश श्रीराममय झाला आहे.