अकोले तालुक्यातील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे (बीजमाता ) यांच्या भन्नाट राख्यांची सध्या चर्चा सुरु आहे.

आपल्या भावासाठी म्हणजेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी आणि जगावेगळी भेट दिलेली आहे.

भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी राख्या स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने त्यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी दादांसाठी ही अनोखी भेट पाठवली आहे. 

राहीबाई पोपेरे यांनी बीज राख्यांची निर्मिती करून त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत हे दाखवून दिले आहे.

कुठलेही काम निष्ठेने केल्यास तेच काम आपल्याला सर्वोच्च स्थानी नेत असतं हेच वेळोवेळी राहीबाईंच्या उदाहरणातून समोर आले आहे.

राहीबाई पोपेरे यांनी म्हटलं की, मी आज राखीपौर्णिमेच्या निमित्तानं बीज राखी बनवल्या आहेत. मी सीमेवरील जवानांना या राख्या पाठवल्या आहेत.

तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला बहिण मानलं आहे. मी त्यांनाही राखी पाठवली आहे, असं राहीबाई म्हणतात.

बहिण भावाचं नातं हे सर्वोत्कृष्ट आहे. हे नातं जपलं जावं. भावा बहिणीचं नातं निसर्गासारखं आहे.

निसर्गासारखं आपल्या बहिणीची काळजी घ्या. सर्व शेतकरी बांधवांना, जवानांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा, असं राहीबाई पोपेरे यांनी म्हटलं आहे.