अभिनेत्री राखी सावंतने अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला राखीनं हायकोर्टात आव्हान दिले आहे. राखीवर शर्लिन चोप्राच्या (Sherlyn Chopra) तक्रारीवरून आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात आंबोली पोलिसांनी राखीची चौकशी केली होती. शर्लिन चोप्राने राखी सावंतवर आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप केला होता. 'ड्रामा क्वीन' राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून राखी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत लग्नासंदर्भातली माहिती चाहत्यांना दिली होती. गेले काही दिवस राखी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखी नुकतीच 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात दिसून आली होती.