नालासोपारा येथे राहणारे राजा जाधव यांना रिझर्व्ह बँकेत कामाला असताना फिरावे लागत असे. साल 1982-83ला गंगोत्रीला गेले असताना लहान, मोठ्या आकाराची विविध भाषेची नाणी विकायला ठेवलेली त्यांना दिसली.
ती नाणी ही शेकडो वर्षांपूर्वीची असल्याचं त्यांना समजलं. तिथेच देवनागरी शब्द असलेल्या नाण्यांवर त्यांचे लक्ष गेले, तेव्हा ती शिवकालीन नाणी असल्याचं त्यांना समजलं आणि ती सर्व नाणी त्यांनी विकत घेतली.
तेव्हापासून जाधव यांचा नाणीसंग्रह करण्याचा प्रवास आजही सुरू आहे. आज त्यांच्याकडे विविध प्रकारची नाणी असली तरी 'शिवराई' नाणी ही त्यांच्यासाठी खास असल्याचं जाधव सांगतात.
शिवकाळातला सोन्याचा 'होन' मिळणे दुर्लभ असले, तरी ताब्यांची शिवराई मात्र अजूनही गड-किल्यांवर किंवा जुन्या शिवकालीन वाड्यांमध्ये, मंदिरात आढळून येत असल्याचं जाधव सांगतात.
जाधवांकडे 3 हजार शिवराई नाणी आहेत. त्यावर मनुष्याकृती, पशू-पक्षी, हत्यारे, झाडे ते चंद्र-सूर्यापर्यंतची चिन्हे, अशी चित्र काढलेली आहेत.
जाधवांच्या नाणी संग्रहाचा छंद अद्यापही सुरू आहे. त्यांच्याकडे जवळजवळ पंधरा हजाराहून अधिक नाणी आहेत. अत्यंत दुर्मिळात दुर्मिळ अशी नाणी असून त्यात अकबराची चांदीची नाणी, अकबर दाम औरंगजेब, शहाआलम (एक आणि दोन), शहाजान, ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी, राणी एलिझाबेथ, यादव कालीन, मोहम्मद तुघलक, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी विशिष्ट नाणी वापरली जात, तीही नाणी जाधव यांच्याकडे आहेत.
तसेच, त्याव्यतिरिक्तही जुन्या नोटा, दुर्मिळ पुस्तकं, द्वितीय महायुद्धातील वृत्तपत्रातील मथळे असे अनेक ऐतिहासिक दस्ताऐवज त्यांच्या नालासोपारा येथील राहत्या घरातील छोटेखानी संग्रहालयात आहेत.