अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली होती. अकोला क्रिकेट क्लबवरील मैदानावर हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम पार पडला. पाऊस असतानाही लोकांनी सभेला चांगलीच गर्दी केली होती. प्रकाश आंबेडकर भाषण देत होते, तेव्हा पाऊस सुरु झाला परंतु त्यांनी आपले भाषण न थांबवले नाही. पावसात न थांबता भाषण देत राहणं हा ट्रेंड सुरु करणाऱ्या शरद पवार यांनाही प्रकाश आंबेडकर यांनी टोला लागवला. शरद पवार यांनी साताऱ्यातील सभा गाजवल्यानंतर पावसात भाषण देणं हा राजकारण्यांमध्ये ट्रेंड झाला आहे. पवार यांच्यानंतर जयंत पाटील, आदित्य ठाकरे, त्यानंतर राहुल गांधी यांनी भरपावसात सभा घेत भाषण केलं होतं. आता या पंक्तीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचंही नाव सामील झालं आहे. या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली.