शाहरुख खाननं पठाण चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. पठाण हा चित्रपट भारताबरोबरच परदेशात देखील कोट्यवधींची कमाई करत आहे. पठाण चित्रपट रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत. सात दिवसात या चित्रपटानं भारतामध्ये 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी 'पठाण'ने 55 कोटींची कमाई केली आहे. आता मंगळवारी (31 जानेवारी) या चित्रपटानं 21 कोटींचे कलेक्शन केलं आहे. सात दिवसात या चित्रपटानं भारतात 328.25 कोटींची कमाई केली आहे. तरण आदर्शच्या ट्वीटनुसार, पठाण चित्रपटानं 300 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात लवकर सामील होणारा चित्रपट ठरला आहे. पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. पठाण या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.