आज देशभरात धनत्रयोदशीचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

याचं कारण आहे दोन वर्षांनंतरची निर्बंधमुक्त दिवाळी.

आज दोन वर्षानंतर धनत्रयोदशीच्या गोरज मुहूर्तावर विठुरायाच्या भक्तांनी चंद्रभागेच्या घाटांवर हजारो दिव्यांनी दीपोत्सव साजरा केला.

आज धनत्रयोदशीदिवशी विठ्ठल रुक्मिणीला पारंपरिक अनमोल दागिन्यात नटविण्यात आले .

दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असल्याने घरोघरी दिव्यांची आरास होत असताना चंद्रभागेच्या काठी देखील अशी दिव्यांची आरास केली जाते.

गेल्या काही वर्षांपासून वारकरी आणि पंढरपूरकर घाटांवर दिव्यांची आरास करीत असतात.

आज सायंकाळपासून बालगोपाळांसह भाविकांनी एकत्रित येत घाटांवर दिवे लावण्यास सुरुवात केली.

चंद्रभागेच्या जवळपास 14 घाटांवर हा दीपोत्सव साजरा केला गेला.

सध्या पुराच्या पाण्यामुळे चंद्रभागा थेट घाटांपर्यंत पोहोचल्याने या दृश्याने चंद्रभागा खूपच खुलून दिसत आहे .