श्री साई पुण्यतिथी उत्सवानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. दरवर्षीं साजरा होणाऱ्या चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला आज पहाटे काकड आरती व ग्रंथ मिरवणुकीने सुरुवात झाली आहे. आज पहाटे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते आज पाद्य पूजा व ग्रंथ मिरवणूक पार पडली. श्री साई पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने दिवस विविध चार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य दिवस मंगळवारी काकड आरती, अखंड पारायण समाप्ती, पाद्यपूजा, भिक्षा झोळी असे विविध कार्यक्रम होणार आहेत. सोमवार, दि. 23 ते गुरुवार 26 ऑक्टोबर या कालावधीत श्रीसाईबाबांचा 105 वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत आहे. या चार दिवसांच्या उत्सव काळात मुख्य समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. त्यामुळे भाविक भक्तांना मनोभावे दर्शन घेता येणार आहे. साई मंदिर परिसरातील चार नंबर प्रवेशद्वारासमोर आकर्षक असा राम मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. यावर्षी साकारलेला राम मंदिर देखावा व प्रभू श्रीरामाची 23 फूट मूर्ती साई भक्तांसाठी आकर्षण ठरतेय.