लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे.

आज चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे यात्रा भरु शकली नव्हती.

दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस 16 एप्रिल असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबाच्या चैत्र यात्रेला प्रारंभ झाला आहे.

यंदा मात्र दोन वर्षानंतर यात्रा भरत असल्याने लाखो भाविक जोतिबाच्या डोंगरावर दाखल झाले आहेत.

ढोल-ताशाचा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि चांगभलचा गजर यामुळे परिसर दणाणून गेला आहे.

महाराष्ट्र कोरोनाच्या निर्बंध मुक्त झाल्यानतंर जोतिबाची चैत्र यात्रेत दोन वर्षांनंतर सासनकाठ्या नाचवण्याचा योग आला आहे.

डोंगरावर भाविकाची मांदियाळी वाढली असून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत.

यात्रा आणि होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.