आपल्या अभिनय कौशल्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे विक्रम गोखले यांना त्यांच्या कारकिर्दित अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनदेखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. सन 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार 2015 मध्ये प्रदान करण्यात आला होता. ‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार 2017 साली प्रदान करण्यात आला. पुलोत्सव सन्मान हा डिसेंबर 2018 मध्ये देण्यात आला होता. चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.