इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) चांगलाच फॉर्मात आहे. इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) मध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या बटलरची बॅट शांत होण्याचं नाव घेत नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत त्यानं आक्रमक फलंदाजी करत अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. नेदरलँड्सविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान बटलरनं महेंद्रसिंह धोनीचा 17 वर्षे जुना विक्रमही मोडलाय. एकदिवसीय मालिकेत बटलरनं यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रमाची रचलाय. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. बटलरनं नेदरलँड्सविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 19 षटकार ठोकले. धोनीनं 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एका एकदिवसीय मालिकेत 17 षटकार मारले होते. धोनीपाठोपाठ एबी डिव्हिलियर्सचा क्रमांक लागतो, एबी डिव्हिलियर्सनं 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 16 षटकार ठोकले होते. या यादीत बटलरचं चौथ्या क्रमांकावर आहे. बटलरनं 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 14 षटकार मारले होते. जोस बटलरनं नुकताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 हजार 281 चेंडूत 4,000 धावांचा टप्पा पार गाठलाय.