ISRO चंद्रयान 3 मोहिमेसाठी सज्ज आहे. 14 जुलै 2023 रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून चंद्रयान 3 चं उड्डाण होणार आहे.
या खास मोहिमेचं नेतृत्त्व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रितु करिधल श्रीवास्तव करत आहेत. चंद्रयान 3 मोहिमेच्या त्या संचालक आहेत.
डॉ. रितु करिधल यांना भारताची 'रॉकेट वुमन' असं म्हटलं जातं. त्यांनी अतिशय महत्त्वाच्या मंगलयान मोहिमेवर काम केलं होतं.
मंगळ ग्रहावर पोहोचणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे. डॉ. रितु करिधल यांच्यावर मंगलयानाच्या ऑटोनॉमी सिस्टमची जबाबदारी होती.
डॉ. रितु करिधल यांनी चंद्रयान 2 देखील लॉन्च केलं होतं. तेव्हा देखील त्या मोहिमेच्या संचालक होत्या.
लखनौमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या रितु यांना अंतराळ, अवकाशाबद्दल आकर्षण होतं.
रितु करिधल या वृत्तपत्रांमध्ये नासा आणि इस्रोच्या मोहिमांबद्दल वाचत असत. त्यांच्याकडे आजही त्याची कात्रणं आहेत.
अंतराळाबद्दल जाणून घेण्याची त्यांची इच्छा होती. याच जिज्ञासामुळे त्या आधी विज्ञानाकडे मग इस्रोकडे वळल्या.
2007 मध्ये डॉ. रितु करिधल यांना तत्कालीन राष्ट्रपती आणि 'मिसाईल मॅन' डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते युवा वैज्ञानिका हा पुरस्कार मिळाला.
2019 मध्ये लखनौ विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेटने पदवीने सन्मानित केलं.
डॉ. रितु करिधल यांच्या पतीचं नाव अविनाश श्रीवास्तव आहे. त्यांना आदित्य आणि अनिषा नावाची दोन अपत्ये आहेत. मंगलयान मोहिमेच्या तयारीच्या वेळी त्या मुलांचा अभ्यास घेत असत. मग रात्री जागून मोहिमेवरील आपलं काम करायच्या.