दक्षिण बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याचं 'चक्रीवादळात रूपांतर झालं. ज्याला 'मिचॉन्ग' चक्रीवादळ असं नाव देण्यात आलं. आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान आज म्हणजेच, मंगळवारी हे चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) यासंदर्भात माहिती दिली आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाचा कहर देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये होताना दिसत आहे. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे घडलेल्या दुर्घटनांमुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. भुयारी मार्ग आणि रस्ते बंद करण्यात आलेत. विमानतळावरही पाणी साचल्यानं विमानसेवाही खंडीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्यानं रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ आज नेल्लोर आणि मछलीपट्टनम दरम्यान आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. 'मिचॉन्ग' चेन्नईच्या सुमारे 100 किमी ईशान्येस आणि नेल्लोरच्या 120 किमी आग्नेयेला दक्षिण बंगालच्या उपसागरात आज 2:30 वाजता मध्यवर्ती आहे.